Hardik Patel Will Join BJP: हार्दिक पटेल लवकरच भाजपात प्रवेश करणार, प्रवेशाची तारीखही ठरली

hardik patel

मागील काही दिवसांपासून गुजरातचे नेते हार्दिक पटेल (Hardik Patel ) हे भाजपात (BJP) प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना मोठ्या प्रमाणात उधाण आलं होतं. अखेर काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला (Congress) रामराम ठोकला असून ते लवकरच भाजपात प्रवेश करणार (Hardik Patel Will Join BJP) आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या नेतृत्वाबद्दल नाराजी व्यक्त करत हार्दिक पटेल यांनी राजीनामा दिला होता. यामध्ये त्यांनी पक्षाचे वरिष्ठ नेते कोणत्याही कामाची कृती न करता सरकारच्या धोरणावर टीका करण्यातच धन्यता मानतात, असं हार्दिक पटेल यांनी म्हटलं होतं.

हार्दिक पटेल यांनी काही दिवसांपूर्वी भाजपाच्या कामाची स्तुती करत काँग्रेसवर टीका केली होती. वर्षाच्या अखेरीस गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्यामुळे आता पटेल यांची नाराजी आणि त्यांचा राजीनामा काँग्रेसला महागात पडणार आहे. तसेच हार्दिक पटेल हे २ जून रोजी भाजपात प्रवेश करणार आहेत.

पटेलांनी पक्षातून राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर हल्लाबोल करण्यास सुरूवात केली आहे. काँग्रेसच्या आरोपानुसार पटेल मागील ६ वर्षांपासून भाजपच्या संपर्कात आहेत, असे आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहेत. तसेच
गुजरातमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शक्तीसिंह गोहिल यांनी हार्दिकच्या राजीनाम्यामागे भाजपचा हात असल्याचा देखील आरोप केला आहे. या सर्व आरोप प्रत्यारोपानंतर आता हार्दिक पटेल २ जून रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समोर आले आहे.

हार्दिक पटेल हे गुजरातमधील पाटीदार समाजाच्या आंदोलनाचा प्रमुख चेहरा होते. मात्र अंतर्गत कलहामुळे त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. राजीनामा देत असताना त्यांनी काँग्रेसच्या कार्यश्रेणीवर बोटही उठवलं होतं. त्यानंतर ते भाजपात प्रवेश करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.


हेही वाचा : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर; अनेक दिग्गज नगरसेवकांना धक्का