सुप्रीम कोर्ट सुनावणी: आम्ही पक्षातील नाराज सदस्य, हरिश साळवेंचा शिंदे गटाकडून युक्तीवाद

आपला नेता भेटत नाही म्हणून कोणी नवा पक्ष स्थापन करू शकता का असा प्रश्न सरन्यायाधीशांनी आज सुनावणी दरम्यान उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांनी आम्ही पक्षातच आहोत, पक्ष सोडलेला नाही, असा खुलासा केला. यावर सरन्यायाधिशांनी पुन्हा प्रश्न विचारला की पक्षात तुम्ही कोण आहात? पक्षातील तुमची भूमिका काय? यावर हरिश साळवे म्हणाले की आम्ही पक्षातील नाराज सदस्य आहोत.

हेही वाचासुप्रीम कोर्ट सुनावणी: दोन तृतीयांश लोक पक्षावर दावा करू शकत नाहीत, सिब्बलांनी व्याख्याच वाचून दाखवली

शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊन दोन गट निर्माण झाले आहेत. शिंदे गटाने भाजपसोबत येऊन नव्याने सत्ता स्थापन केली आहे. तर, त्यांनी शिवसेना आणि चिन्हावरही आपला दावा ठोकला आहे. यावरून शिवसेनेने शिंदे गटातील १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. यावर आज युक्तीवाद सुरू असताना आम्ही बंडखोर नसून पक्षातील नाराज सदस्य असल्याचा युक्तीवाद हरिश साळवे यांनी केला आहे.

काही नेते म्हणजेच पक्ष असं भारतात समजलं जातं. त्यामुळे पक्षातील काही लोकांना मुख्यमंत्री बदलावा वाटत असेल तर ते पक्षविरोधी ठरत नाही. तसंच, हा पक्षांतर्गत मुद्दा असल्याचंही हरिश साळवे यांनी पुढे स्पष्ट केलं.

हेही वाचा सत्तासंघर्षावर पुढील सुनावणी होणार उद्या, सर्वोच्च न्यायालयात आज काय झालं? वाचा एका क्लिकवर

पक्ष आणि चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयासोबतच निवडणूक आयोगाकडेही प्रलंबित आहे. त्यामुळे तुम्ही निवडणूक आयोगाकडे का गेलात असा प्रश्न सरन्यायाधिशांनी शिंदे गटाला विचारला आहे. त्यावर ते म्हणाले की, पक्ष एकच आहे. फक्त खरा नेता कोण यावर वाद सुरू आहेत. पक्ष सोडला असेल तरच पक्षांतर बंदी कायदा लागू होतं, असंही साळवेंनी पुढे स्पष्ट केलं. मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे चिन्हाबाबत ठरवण्याकरता आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो असल्याचंही हरिश साळवे यांनी सांगितलं.

दरम्यान, शिंदे गटाकडून लेखी युक्तीवादही सादर करण्यात आला. मात्र, या लेखी युक्तीवादातून कायदेशीर मुद्द समजत नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. मुद्दे स्पष्ट होत नसल्याने सुधारित युक्तीवाद द्या. हा युक्तीवाद उद्या दिला तरी चालेल असंही सर्वोच्च न्यायालयाने हरिश साळवे यांना सांगितले. तेव्हा आजच सुधारित युक्तीवाद सादर केला जाईल असं साळवे म्हणाले.