Hathras Rape Case: आज लखनऊ खंडपीठासमोर होणार सुनावणी; कडेकोट पोलीस बंदोबस्तात पीडितेचे कुटुंब रवाना

family members of hathras gangarape victim leave for lucknow to appear before hc bench

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावर (Hathras Gang Rape Case) आज अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. यासाठी पोलिसांच्या कडक बंदोबस्तात पीडितेच्या कुटुंबातील सदस्य राजधानी लखनऊला रवाना झाले आहेत. पोलीस आणि प्रशासकीय कर्मचार्‍यांसह सकाळी कुटुंबातील सदस्य रवाना झाले. देशभराचं लक्ष आजच्या सुनावनणीवर असणार आहे.

उपविभागीय दंडाधिकारी अंजली गंगवार यांनी सांगितलं की त्या स्वत: कुटुंबासमवेत जात आहे. त्या म्हणाल्या की सुरक्षेची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षक देखील सोबत असणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पीडितेचे वडील, आई, भाऊ यांच्यासह पाच लोक न्यायालयात घडलेल्या घटनेची माहिती देणार आहेत.

रात्रीचं निघण्यास कुटुंबाचा नकार

पोलीस पीडितेच्या कुटुंबाला रविवारी रात्री घेवून जाणार होते. परंतु कुटुंबाने स्वतःच्या जीवाला धोका असल्याचं सांगून रात्री जाण्यास नकार दिला. उच्च न्यायालयाने हाथरस घटनेची दखल घेतली आहे. न्यायालयाने प्रधान सचिव गृह, पोलीस महासंचालक, पोलीस अधीक्षक आणि जिल्हा दंडाधिकारी हाथरस यांना समन्स बजावलं आहे.

२९ सप्टेंबरला पीडितेचा मृत्यू

१४ सप्टेंबरला हाथरस जिल्ह्यातील चंदपा भागात १९ वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना समोर आली होती. पीडित मुलीला अलीगडच्या जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नंतर तिला तातडीने दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयामध्ये नेण्यात आल आणि तिचा २९ सप्टेंबरला मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर रात्री पीडितेवर अंत्यसंस्कार करण्यात आलं. यानंतर या घटनेचा निषेध करण्यासाठी देशात निदर्शने करण्यात आली. काँग्रेसचे सरचिटणीस प्रियंका गांधी आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी पीडित मुलीच्या कुटुंबाला भेटण्यासाठी हाथरसला गेले.