Hathras Rape Case : पीडितेच्या शवविच्छेदन अहवालातले धक्कादायक उल्लेख उघड!

18 year old girl raped in nalasopara
प्रातिनिधिक छायाचित्र

उत्तर प्रदेशमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्यी हथरस सामुहिक बलात्कार घटनेवरून (Hathras Rap Case in UP) देशभरातलं वातावरण तापलं आहे. गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी देशभरातून केली जात आहे. सोशल मीडियावर देखील यासंदर्भात प्रचंड संतापाचा सूर असतानाच या तरुणीच्या शवविच्छेदन अहवालातून काही धक्कादायक उल्लेख समोर आले आहेत. त्यामुळे पुरावे नष्ट करण्यासाठीच तरूणीच्या मृतदेहावर घाईघाईने अंत्यसंस्कार करण्यात आल्याचं बोललं जात आहे. पीडितेचा मृत्यू बलात्काराने झालेला नसून पाठिला झालेल्या दुखापतीमुळे झाल्याचं अहवालात नमूद केलं आहे. तसेच, मृत्यूच्या आधी तिच्यावर बलात्कार झाला होता किंवा नाही, हे अहवालावरून स्पष्ट होत नाहीये. त्यामुळे या प्रकरणात संशयाचं मोठं वलय निर्माण होऊ लागलं आहे. एनडीटीव्हीनं या अहवालासंदर्भात वृत्त दिलं आहे.

पोलिसांनी रातोरात केले अंत्यसंस्कार

उत्तर प्रदेशच्या हथरसमध्ये एका तरुणीवर सामुहिक बलात्कार करून तिला पाशवी मारहाण करून, तिची जीभ छाटून तिला विव्हळत सोडून देण्याचा भीषण प्रकार घडला होता. शिवाय, तिच्या कुटुंबियांना देखील मृतदेह पाहायला न मिळता पोलिसांनी रात्रीच्या अंधारात मृतदेहावर अंत्यसंस्कार केले होते. त्या प्रकरणी उत्तर प्रदेश सरकार आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. या घटनेनंतर उत्तर प्रदेशमध्ये लागोपाठ बलात्काराच्या तीन घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे त्याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. पण हथरसच्या घटनेच्या शवविच्छेदन अहवालामुळे आगीत तेल ओतण्याचं काम झालं आहे.

काय म्हटलंय शवविच्छेदन अहवालात?

१. शवविच्छेदन अहवालामध्ये पीडितेवर बलात्कार झाल्याचा उल्लेख.मात्र, मृत्यूच्या आधी बलात्कार झाला होता किंवा नाही, याविषयी उल्लेख नाही.
२. तिच्या गळ्यावरच्या खुणांवरून तिचा गळा दाबण्यात आल्याचं स्पष्ट होत आहे.
३. मात्र, गळा दाबल्यामुळे तिचा मृत्यू झाला नसल्याचे प्राथमिक संदर्भ.
४. पीडितेच्या पाठीला गंभीर दुखापत झाली होती. तिचा मणका फ्रॅक्चर झाला होता. या झटक्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा उल्लेख.
५. व्हिसेराच्या मदतीने बलात्कार झाला किंवा नाही हे स्पष्ट होऊ शकेल.

तक्रारीत घटनाक्रम उघड

दरम्यान, पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीत घटनाक्रमाचा उलगडा झाला आहे. सुरुवातीला पोलिसांनी फक्त जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. पीडित तरुणीच्या जबाबानंतर सामुहिक बलात्काराचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला. पीडित तरुणी शेतात गेली असता तिथे चार जणांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. तिची जीभ छाटली. तसेच, तिचा गळा आवळून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तिला प्रत्यक्षदर्शींनी पाहिलं, तेव्हा तिच्या मानेवर देखील जखमा होत्या. तिला अर्धांगवायूचा झटका देखील आल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनी तक्रारीत केला आहे.

दरम्यान, या प्रकरणी चौघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.


हेही वाचा :

Hathras Gangrape : …म्हणून पीडित कुटुंब गाव सोडण्याच्या तयारीत
GangRape Victim: हाथरस घटनेसारखेच बलरामपूरातील पीडितेवरही रातोरात अंत्यसंस्कार