द्वेष हा सर्व धर्मांचा समान शत्रू, सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

नवी दिल्ली : प्रत्येक शब्द द्वेषपूर्ण मानला जाऊ शकत नाही. पण मनातून द्वेष भावनाच काढून टाकूया, मग फरक पाहा. द्वेष हा सर्व धर्मांचा समान शत्रू आहे. देशाकडे सनातन ज्ञानाबरोबरच एक महान संस्कृती आहे, जी जगभरात अद्वितीय आहे. द्वेष भावनेद्वारे त्याचे मूल्य कमी करू नका, असे आवाहन सर्वोच् न्यायालयाने केले.

द्वेषयुक्त भाषणांवर नियंत्रण आणण्यासंबंधीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी न्यायमूर्ती के एम जोसेफ आणि न्यायमूर्ती बी व्ही नगररत्न यांच्या खंडपीठाने हे मत व्यक्त केले. आपल्या आणि सर्व धर्मांचा एकच समान शत्रू आहे आणि तो म्हणजे ‘द्वेष’.

या महिन्याच्या सुरुवातीला मुंबईतील सकल हिंदू समाजाच्या मेळाव्यात कथित द्वेषपूर्ण भाषणाविरुद्ध केरळचे रहिवासी शाहीन अब्दुल्ला यांनी याचिका दाखल केली आहे. तेथे कोणतेही द्वेषयुक्त भाषण करण्यात आले का, असा सवाल खंडपीठाने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना विचारला. त्यावर, आपल्याला दिलेल्या माहितीनुसार असे कोणतेही वक्तव्य केले नसल्याचे मेहता यांनी सांगितले.

दोन दिवसांपूर्वी आम्ही अरविंद केजरीवाल (दिल्लीचे मुख्यमंत्री) यांच्याविरुद्ध आयपीसी कलम 153A आणि कायद्याच्या इतर तरतुदींखालील एका प्रकरणात कार्यवाहीला स्थगिती दिली होती, असे खंडपीठाने याचिकाकर्त्यांपैकी एकाचे प्रतिनिधित्व करणारे वकील एम निजामुद्दीन पाशा यांना सांगितले. जे काही बोलले जाते ते द्वेषपूर्ण भाषण आहे असे नाही. द्वेषपूर्ण भाषणात विशिष्ट अपशब्दांचा वापर केलेला असणे, आवश्यक आहे. कोणती विधाने किंवा भाषणे द्वेषपूर्ण भाषणाच्या कक्षेत येतात हे देखील आपल्याला निर्धारित करावे लागेल, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारकडून या कार्यक्रमाचा व्हिडीओ आणि कृती अहवाल मागवला आहे. न्यायालयाने हिंदू फ्रंट फॉर जस्टिसच्या अर्जावर सुनावणी घेण्याचेही मान्य केले आहे. संबंधित घटनांची व्हिडीओ क्लिप तसेच केलेल्या वक्तव्ये सादर करू, असे सॉलिसिटर जनरल मेहता म्हणाले. आता या प्रकरणावर 21 मार्चला सुनावणी होणार आहे.