नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (23 सप्टेंबर) वाराणसीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी केली. यावेळी व्यासपीठावर यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर, कपिल देव, बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांसारख्या क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांसह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या पायाभरणी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितींना संबोधित केले. (He who plays will bloom Foundation laying of cricket stadium by Modi in Varanasi in presence of Sachin Tendulkar)
हेही वाचा – ‘या’ महिला अधिकाऱ्याने पाकिस्तानला UN मध्ये खडसावले; ‘मुंबई-26/11 हल्ल्यांतील दोषींवर प्रथम कारवाई करा’
नरेंद्र मोदी म्हणाले की, स्टेडियम देवाच्या थीमवर बांधण्यात येणार आहे. खेळाबाबत समाजाचा विचार बदलला आहे. त्यामुळे आज जो खेळेल तो फुलेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मोदी म्हणाले की, आज क्रिकेटच्या माध्यमातून जग भारताशी जोडले जात आहे. क्रिकेट खेळण्यासाठी नवे देश पुढे येत आहेत. साहजिकच आगामी काळात क्रिकेट सामन्यांची संख्या वाढणार आहे. जेव्हा सामन्यांची संख्या वाढेल तेव्हा नवीन स्टेडियमची गरज भासेल, तेव्हा बनारसचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम ही मागणी पूर्ण करेल. हा स्टेडियम संपूर्ण पूर्वांचलचा चमकता तारा बनेल, असेही मोदी म्हणाले.
#WATCH | The success India is witnessing in sports is evidence of the change in outlook towards sports. The government is helping sportspersons at every level; TOPS is one such scheme of the government: PM Modi in UP’s Varanasi pic.twitter.com/hZf73URi0n
— ANI (@ANI) September 23, 2023
स्टेडियम तरुणांसाठी वरदान ठरेल
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज मी अशा दिवशी काशीला आलो आहे, जेव्हा भारत शिवशक्ती बिंदूवर पोहोचून चंद्रावर एक महिना पूर्ण करत आहे. शिवशक्ती म्हणजे गेल्या महिन्याच्या 23 तारखेला आपले चांद्रयान जिथे उतरले ते ठिकाण. शिवशक्तीचे एक स्थान चंद्रावर आहे आणि दुसरे स्थान काशीत आहे. आज काशीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी करण्यात आली आहे. हे स्टेडियम केवळ वाराणसीच्याच नव्हे तर पूर्वांचलच्या तरुणांसाठी वरदान ठरेल. हे स्टेडियम पूर्ण झाल्यानंतर 30,000 हून अधिक लोक याठिकाणी बसून सामना पाहू शकतील. जेव्हापासून या स्टेडियमचे फोटे समोर आली आहेत, तेव्हापासून प्रत्येक काशीवासीय उत्साहित झाला आहे, असे मोदी म्हणाले.
#WATCH | Sachin Tendulkar with PM Modi and CM Yogi Adityanath at the event to mark the foundation stone laying of an international cricket stadium in Varanasi, UP pic.twitter.com/TjgIHNrelD
— ANI (@ANI) September 23, 2023
खेळ तरुणांच्या फिटनेस, रोजगार आणि करिअरशी जोडले जात आहे
काशीतील तरुणांनी क्रीडा क्षेत्रात नाव कमवावे, अशी इच्छा नरेंद्र मोदींनी बोलून दाखवली. त्यांनी सांगितले की, सिग्रा स्टेडियमवर 400 कोटी रुपये खर्च केले जात आहेत. महत्त्वाच्या खेळांसाठी येथे सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. हे स्टेडियम लवकरच काशीला समर्पित करण्यात येईल. खेळ तरुणांच्या फिटनेस, रोजगाराशी आणि त्यांच्या करिअरशी जोडले जात आहे. यावेळी केंद्रीय क्रीडा बजेटमध्ये तीनपट वाढ करण्यात आली आहे. खेलो इंडियाच्या बजेटमध्ये 70 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती नरेंद्र मोदींनी दिली.
क्रीडा पायाभूत सुविधांचा मुलींना फायदा
पीएम मोदी म्हणाले की, खेळाडूंची ओळख करून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. सरकार खेळाडूंसाठी चांगल्या प्रशिक्षणाची व्यवस्था करत आहे.आता छोट्या शहरातील खेळाडूंनाही नवीन संधी मिळणार आहे. खेळांच्या प्रशिक्षणासाठी मुलींना आता घरापासून दूर जावे लागणार नाही. त्यांना क्रीडा पायाभूत सुविधांचा लाभ मिळत आहे. देशाच्या विकासासाठी क्रीडा सुविधांचा विस्तार करणे अत्यंत आवश्यक आहे. हे केवळ खेळासाठीच नाही तर देशाच्या प्रतिष्ठेसाठीही महत्त्वाचे आहे. प्रत्येक विकास कामासाठी मला काशीचा आशीर्वाद आहे. काशीच्या पुनरुज्जीवनासाठी आम्ही असेच विकासाचे नवे अध्याय लिहीत राहू, असे मोदी म्हणाले.