Monsoon Update 2022: पश्चिम बंगालसह ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाने (Monsoon Update 2022) हजेरी लावली आहे. पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) नियोजित वेळेच्या चार दिवस आधीच नैऋत्य मान्सूनने हजेरी लावली आहे. पश्चिम बंगालसह ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आसाम (Assam) आणि मेघालयमध्ये येत्या पाच दिवसांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, उत्तर ओडिशाच्या किनारपट्टीवर आणि पश्चिम बंगालच्या भागात चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे आणि बंगालच्या उपसागरातून ईशान्य भारताच्या दिशेने जोरदार नैऋत्य वारे आल्यामुळे, पुढील पाच दिवसांत ईशान्य राज्य, उप-हिमालय पश्चिमेकडे आणि बंगालमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : Monsoon Update : केरळमध्ये आज मान्सून दाखल होण्याची शक्यता; राज्यात ‘या’ भागात पावसाच्या सरी, IMD अंदाज काय?

बंगालच्या उपसागराच्या ईशान्य आणि पूर्व मध्य भागाच्या काही भागात पुढे सरकला आहे. मिझोराम, मणिपूर आणि नागालँडच्या बहुतांश भागात पोहोचल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तसेच ८ जूनपर्यंत अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

भारतात वायव्य भागातील कमाल तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे हवामान खात्याने पुढील दोन दिवस राजस्थान, दक्षिण पंजाब आणि दक्षिण हरियाणामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. काही दिवसांपूर्वी स्कायमेट वेदरच्या अहवालानुसार, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. तसेच उत्तराखंड, महाराष्ट्र, छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्येही पावसाचा इशारा देण्यात आला होता.


हेही वाचा : Monsoon Update : अखेर मान्सून केरळमध्ये दाखल, हवामान विभागाची माहिती