Homeदेश-विदेशHema Malini : इतकी मोठी घटना नाही, महाकुंभातील चेंगराचेंगरीवर हेमा मालिनी यांचं...

Hema Malini : इतकी मोठी घटना नाही, महाकुंभातील चेंगराचेंगरीवर हेमा मालिनी यांचं वादग्रस्त विधान

Subscribe

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित करण्यात आलेल्या कुंभमेळ्यात 29 जानेवारी रोजी मौनी अमावस्येला झालेल्या चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू आणि 60 जण जखमी झाले आहेत. मात्र भारतीय जनता पक्षाच्या खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी चेंगराचेंगरीची घटना इतकी मोठी नव्हती, असे वक्तव्य केले आहे.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित करण्यात आलेल्या महाकुंभमेळ्यात 29 जानेवारी रोजी मौनी अमावस्येला झालेल्या चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू आणि 60 जण जखमी झाले आहेत. या चेंगराचेंगरी प्रकरणी राजकारण रंगताना दिसत आहे. अशातच भारतीय जनता पक्षाच्या खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी चेंगराचेंगरी प्रकरणी वादग्रस्त विधान केले आहे. कुंभमेळ्यात अलिकडेच चेंगराचेंगरीची दु:खद घटना घडली. पण ती इतकी मोठी नव्हती, असे वक्तव्य हेमा मालिनी यांनी केले आहे. (Hema Malini controversial statement on the stampede at the Mahakumbh)

चेंगराचेंगरीच्या घटनेवर भाष्य करताना हेमा मालिनी म्हणाल्या की, आम्ही कुंभमेळ्याला गेलो होतो, आम्ही संगमामध्ये आंघोळ केली. सगळीकडे चांगले व्यवस्थापन होते. तिथे चेंगराचेंगरीची दु:खद घटना घडली, पण ती घटना इतकी मोठी नव्हती. मात्र चेंगराचेंगरीची घटना मोठी आहे, असे भासवले जात आहे. संगमामध्ये स्थान करण्यासाठी खूप लोक येत आहेत. एवढ्या मोठ्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे कठीण आहे. पण अत्यंत योग्य प्रकारे महाकुंभ मेळाव्याचे नियोजन करण्यात आले असून, प्रत्येक गोष्ट योग्य प्रकारे सुरू आहे. हे सगळे हाताळणं कठीण असलं तरी आम्ही सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करत आहोत, असेही हेमा मालिनी म्हणाल्या. महत्त्वाचे म्हणजे ज्या दिवशी चेंगराचेंगरीची घटना घडली त्याच दिवशी हेमा मालिनी यांनी संगमात स्थान केले होते.

चेंगराचेंगरीच्या घटनेप्रकरणी विरोधकांच्या टीकेवर बोलताना हेमा मालिनी म्हणाल्या की, विरोधक काहीही बोलू शकतात. चुकीच्या गोष्टी बोलणे हे त्यांचे काम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराजला येऊन पवित्र स्नान करणार आहेत. जर परिस्थिती हाताबाहेर असती तर प्रधानमंत्री आले असते का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा – Nitin Gadkari : केंद्र सरकार म्हणते शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, पण नितीन गडकरी म्हणतात…

काँग्रेसचे हेमा मालिनी यांना प्रत्युत्तर 

हेमा मालिनी यांच्या विधानावर बोलताना काँग्रेसने म्हटले की, भाजपा सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे कुंभमेळ्यात मोठ्या संख्येने लोकांना आपले प्राण गमवावे लागले. मात्र या अत्यंत दुःखद घटनेवर भाजपा खासदार हेमा मालिनी म्हणतात की, ‘इतकी मोठी घटना नव्हती.’ त्यांचे हे विधान लज्जास्पद आहे. पहिल्या दिवसापासूनच भाजपा सरकार आणि संपूर्ण सरकारी यंत्रणा ही चेंगराचेंगरीची घटना लपवण्याचा प्रयत्न करत आहे. आतापर्यंत किती लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, हे उघड झालेले नाही. मात्र पीडित कुटुंबाला धीर द्यायचे सोडून प्रशासन ही घटना दडपण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

आर आर पाटील यांच्या वक्तव्याचे स्मरण

मुंबई झालेल्या 26/11 हल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांनी शाहरुख खानच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटातला एक डायलॉग मारला होता. त्यांनी म्हटले होते. की, “बड़े-बड़े शहरों में छोटी-छोटी बातें होती रहती है.” मात्र त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी गोंधळ घातल्यानंतर आर आर पाटील यांना राजीनामा द्यावा लागला होता. अशातच ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनीही महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीवर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्यांनाही राजीनामा द्यावा लागतो का? हे पाहावे लागेल.

हेही वाचा – Supriya Sule : धनंजय मुंडेंचा पाय खोलात; पीकविमा घोटाळ्याची केंद्र सरकार चौकशी करणार, संसदेत आश्वासन