घरदेश-विदेशUttarakhand Violence : हल्द्वानीमधील हिंसाचारामुळे उत्तराखंडात हाय अलर्ट, काय आहे कारण?

Uttarakhand Violence : हल्द्वानीमधील हिंसाचारामुळे उत्तराखंडात हाय अलर्ट, काय आहे कारण?

Subscribe

हल्द्वानी : उत्तराखंडमधील नैनिताल जिल्ह्यातील हल्द्वानी येथील बनभुलपूरा भागात काल गुरुवारी (ता. 08 फेब्रुवारी) हिंसाचार उसळला. या हिंसाचारात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक पोलीस जखमी झाले आहेत. बनभुलपूरा भागात बेकायदेशीरपणे बांधण्यात आलेली मदरसा आणि मदरसाची जागा पाडल्याने हा हिंसाचार उसळल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे हल्द्वानीमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली असून दंगलखोरांना पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले. तर यामुळे इंटरनेटसेवाही बंद करण्यात आली आहे. (High alert in Uttarakhand due to violence in Haldwani)

हेही वाचा… Ravindra Waikar & ED : अजूनही निष्ठा ‘मातोश्री’वरच… पण ईडीचा तुरुंगवास नको; रवींद्र वायकरांची व्यथा

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, हल्द्वानीच्या बनभूलपुरा भागात मलिकच्या बागेत ‘बेकायदेशीरपणे’ बांधलेला मदरसा आणि नमाजची जागा होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गुरुवारी दुपारी दीड ते अडीच वाजेच्या सुमारास एसडीएम आणि महापालिका अधिकारी यांच्यासह पोलिसांचे पथक अवैध मदरसे पाडण्यासाठी गेले होते. अधिकाऱ्यांनी मदरसा आणि नमाजाच्या जागेवर कारवाई केल्यानंतर लगेचच काही लोकांनी दगडफेक सुरू केली. पोलिसांनी जमावाला शांत करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र हिंसाचार करणाऱ्या जमावाने आक्रमकपणे दगडफेक सुरू केली. या दगडफेकीला प्रत्युत्तर देण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला, ज्यानंतर हा जमाव आणखी आक्रमक झाला.

पोलिसांनी लाठीचार्ज करण्यास सुरुवात केल्यानंतर या ठिकाणी आणखी लोक जमा होण्यास सुरुवात झाली. जमावातील काही लोकांनी बॅरिकेट्स तर तोडलेच पण त्यावेळी त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशीही वाद घातला. याचवेळी झालेल्या दगडफेकीत महापालिकेचे कर्मचारी, पत्रकार आणि पोलीस जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत एका अधिकाऱ्याने सांगितले की, परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून पोलिसांनी तात्काळ सौम्य बळाचा वापर करून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळावरून जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडण्यात आल्या. जमाव मागे हटला तरी त्यांनी वाहने पेटवून दिली. पोलिसांच्या गाड्याही जाळण्यात आल्या. सायंकाळी उशिरापर्यंत तणाव आणखीनच वाढला आणि बनभूलपुरा पोलीस ठाण्यालाही आग लावण्यात आली. यानंतर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली.

- Advertisement -

परिस्थिती नियंत्रणा बाहेर जात असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर तत्काळ त्या ठिकाणी रामनगर, नैनिताल येथून अतिरिक्त फौजफाटा बनभुलपुरा येथे मागविण्यात आला. तर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी नैनितालचे जिल्हादंडाधिकारी यांना परिस्थिती सामान्य ठेवण्यासाठी दंगलखोरांना पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्र्यांनी सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून दंगलखोरांवर कारवाई करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. हिंसाचारामुळे हल्द्वानीमध्ये दुकाने आणि शाळा पूर्णपणे बंद आहेत. मुख्यमंत्री धामी या संपूर्ण प्रकरणावर अधिकाऱ्यांकडून क्षणोक्षणी अपडेट्स घेत आहेत. वनफुलपुरा येथील तणावाचे वातावरण पाहता प्रशासन आता डेहराडूनमध्येही सतर्क झाले आहे. डेहराडूनच्या डीएम सोनिका सिंह आणि एसएसपी अजय सिंह यांची संयुक्त टीम सातत्याने संवेदनशील भागांचा दौरा करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -