
Karnataka Hijab Controversy : कर्नाटकातून सुरु झालेल्या हिजाबबाबत प्रकरण सातत्याने जोर धरत आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश आणि सुनावणी प्रलंबित असतानाही हिजाबबाबत रोज नवे वाद उफाळून येत आहेत. या प्रकरणाचे लोण आता शीख समुदायापर्यंत पोहचले आहे.
हिजाब, भगवा गमचा आणि इतर धार्मिक कपडे आणि धार्मिक प्रतिक असलेले चिन्ह परिधान करुन वर्गात जाण्यात बंदी असताना आता बंगळुरुमधील एका महाविद्यालयात पगडी परिधान केलेल्या शीख विद्यार्थिनीलाही प्रवेश नाकारण्यात आला आहे. याप्रकरणावरून आता विद्यार्थीनीच्या कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याचवेळी पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल म्हणाले की, शीख समुदाय त्यांच्या धार्मिक प्रतीकांची होणारी विटंबना सहन करणार नाही.
आदेशाची माहिती दिल्याची कॉलेज व्यवस्थापनाचे मत
कॉलेज व्यवस्थापनाचे म्हणणे आहे की, त्यांनी सर्व विद्यार्थी आणि पालकांना संस्था सुरू होण्यापूर्वीच म्हणजेच 16 फेब्रुवारीला कर्नाटक उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाची माहिती दिली होती. या आदेशानुसार, हिजाब प्रकरणी अंतिम निर्णय होईपर्यंत सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब, भगवा गमछा, शाल आणि स्कार्फसह सर्व प्रकारची धार्मिक चिन्हे परिधान करण्यास मनाई आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयात काय निर्णय घेईल त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देता येईल.
शीख विद्यार्थ्याची या वादात कशी झाली एंट्री?
नुकतेच बंगळुरुतील एका महाविद्यालयाच्या दौऱ्यावर आलेल्या प्री-विद्यापीठ शिक्षण उपसंचालकांना विद्यार्थिनींचा एक गट हिजाब परिधान करुन आल्याचे दिसले. यावेळी त्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाबाबत सूचना देत हिजाब काढण्यास सांगितले. यादरम्यान काही मुलींनी शीख विद्यार्थिनींनी पगडी घातल्याचा मुद्दाही उपस्थित केला. या मुस्लिम विद्यार्थिनींनी सांगितले की कोर्टाच्या आदेशानुसार, शीख मुलींनाही पगडी घालून प्रवेश दिला जाऊ नये. यानंतर कॉलेज व्यवस्थापनाने या संदर्भात शीख विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांशी चर्चा केली.
अंतरिम आदेशात शीख पगडीचा उल्लेख नाही, शीख विद्यार्थीनींचे मत
त्याचवेळी पीटीआय या वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थी अमृतधारी शीख कुटुंबातील आहे. धार्मिक मान्यतेनुसार अमृतधारी कुटुंबातील मुलीही डोक्यावर पगडी बांधतात. मात्र कर्नाटक हायकोर्टाने दिलेल्या अंतरिम आदेशात, शीख समुदाय आणि पगडीचा उल्लेख नव्हता, असे शीख मुलीच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत कॉलेज व्यवस्थापनाने प्रवेश रोखणे अन्यायकारक असल्याचे म्हणत याप्रकरणी कायदेशीर पर्याय शोधत असल्याचे शीख विद्यार्थीनींच्या पालकांचे मत आहे.
मुख्यमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करावा, सुखबीर बादल यांची मागणी
पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांनी ट्विट करून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची मागणी केली आहे. बादल म्हणाले की, शीख समुदाय सरबत दा भला तत्त्वासह सर्व धर्मांचा आदर करतो, परंतु त्याचवेळी त्यांच्या परंपरांचा अभिमान बाळगतो. अशा परिस्थितीत शीख धर्माचा अपमान सहन केला जाणार नाही. मुख्यमंत्री बोम्मई यांनी तात्काळ हस्तक्षेप करून बंगळुरू येथील महाविद्यालयातील घडामोडी रोखण्यासाठी आवश्यक सूचना द्याव्यात.