हिमाचलमध्ये 40 जागा जिंकत काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत; भाजपला ‘इतक्या’ जागांवर यश

himachal pradesh election result 2022 congress win

गुजरातमध्ये दणदणीत विजय मिळवणाऱ्या भाजपला हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने धूळ चारली आहे. हिमाचलमध्ये काँग्रेसने 40 जागा जिंकत बहुमत मिळवलं आहे. काँग्रेसने 40 जागा जिंकत हिमाचलमध्ये एकहाती सत्ता काबीज केली आहे. तर भाजपला केवळ 25 जागांवर समाधान मानावे लागले आहे. याशिवाय 3 जागा अपक्षांनी जिंकल्या आहेत. यात आम आदमी पक्षाला आपले खातेही उघडता आले नाही. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला 43.9 टक्के तर भाजपला 43 टक्के मते मिळाली आहेत. तर आपला फक्त 10.4 टक्के मत मिळाली आहेत. जनतेने यंदाही सत्ताबदलाची परंपरा कायम ठेवल्याचं हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होतेय.

या निवडणुकीत 2017 च्या तुलनेत भाजपच्या 19 जागा कमी झाल्या आहेत. या निकालानंतर आता हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी राजीनामा दिला आहे. लवकरच काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. दरम्यान, हिमाचल प्रदेशमध्ये आता नवीन सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसने शुक्रवारी शिमल्यात निवडून आलेल्या आमदारांची बैठक बोलावली आहे.

भाजपच्या 8 मंत्र्यांचा पराभव

हिमाचल प्रदेशमध्ये प्रत्येक निवडणुकीत 45 ते 75 टक्के मंत्री निवडणूक हरत असल्याचा रेकॉर्ड आहे. यावेळीही जयराम ठाकूर मंत्रिमंडळातील 10 पैकी 8 मंत्री निवडणुकीत पराभूत झाले. निवडणुकीत पराभूत झालेल्या मंत्र्यांमध्ये सुरेश भारद्वाज, रामलाल मार्कंडा, वीरेंद्र कंवर, गोविंद सिंह ठाकूर, राकेश पठानिया, डॉ. राजीव सैजल, सरवीन चौधरी, राजेंद्र गर्ग यांचा समावेश आहे. जयराम ठाकूर यांच्याशिवाय केवळ बिक्रम ठाकूर आणि सुखराम चौधरी यांनाच निवडणूक जिंकता आली.

घोडेबाजार होण्याची भीती

हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने एकहाती सत्ता स्थापन केली आहे. काँग्रेसला या विजयी आनंदाबरोबर आता घोडेबाजार होण्याची भीती आहे. हिमाचलमध्ये भाजप ऑपरेशन लोटस राबवण्याची भीती काँग्रेसला आहे. त्यामुळे काँग्रेस आमदारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी हीच भीती व्यक्त केली. भाजप कोणत्याही थराला जाऊ शकते. त्यामुळे आमदारांना सुरक्षित ठिकाणी ठेवावं लागेल, असं विधान त्यांनी केलं आहे.


बेजबाबदार नेत्याने गुजरातच्या जनतेची माफी मागावी, जे.पी. नड्डांचा केजरीवालांना टोला