निकालापूर्वीच हिमाचलमध्ये काँग्रेस पक्षात मुख्यमंत्रिपदावरून वाद?

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली असून काँग्रेस आणि भाजपामध्ये काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकींच्या निकालाचा कल हाती येत आहे. हाती आलेल्या कलानुसार, सध्या काँग्रेस आघाडीवर आहे.

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला (Himachal Live Update) सुरूवात झाली असून काँग्रेस आणि भाजपामध्ये काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकींच्या निकालाचा कल हाती येत आहे. हाती आलेल्या कलानुसार, सध्या काँग्रेस आघाडीवर आहे. तसेच, भाजपा पिछाडीवर असून, इतर २ जागांवर पुढे आहे. अद्याप योग्य निकाल जाहीर होणे बाकी आहे. मात्र त्यापूर्वीच काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारीवरून रस्सीखेच सुरू झाली आहे. माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह यांनी मुख्यमंत्रिपदासाठी अप्रत्यक्षरीत्या दावेदारी ठोकल्याचे समजते. (Himachal Pradesh before election results pratibha singh arguing over the post of chief minister)

हिमाचल प्रदेशमधील काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष प्रतिभा सिंह प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या की, हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस सरकार स्थापन करणार आहे. जनतेने वीरभद्र सिंह यांचा चेहरा आणि कामांच्या आधारावर मतदान केले आहे. काँग्रेसने जी कामं केली आहेत, त्यावर जनतेने विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे आता जनता वीरभद्र सिंह यांच्या कामांच्या उपकारांची परतफेड करू इच्छित आहे.

शिवाय, “वीरभद्र सिंह यांच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. मात्र आमदारांचे मत आणि हायकमांड मुख्यमंत्रिपदावर कोण बसेल याचा निर्णय घेईल. काँग्रेसमध्ये कुठलाही गटतट नाही आहे. अनेकजण मुख्यमंत्रिपदाचे दावेदार आहेत. आम्ही एकत्र बसून सर्वसहमतीने मुख्यमंत्रपदाचा चेहरा निश्चित करू”, असे मुख्यमंत्रिपदाबाबत प्रतिभा सिंह म्हणाल्या.

हिमाचल प्रदेशमधील मतमोजणी सुरू असून सध्या काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीची लढत सुरू आहे. सध्याच्या निकालानुसार, हिमाचल प्रदेशमध्ये ६८ जागांपैकी भाजपा ३२ आणि काँग्रेस ३४ जागांवर आघाडीवर आहे. तर इतर २ जागांवर आघाडी घेतली आहे.

हिमाचल प्रदेशात पाच वर्षांनी सरकार बदलण्याची प्रथा आहे. 1985 पासून कोणत्याही पक्षाने सलग दोन विधानसभा निवडणुका जिंकलेल्या नाहीत. यावेळी या राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता कायम राहिली तर तो विक्रम ठरेल. सध्या सुरू असलेल्या मतमोजणीतून याचा निर्णय होणार आहे. राज्याच्या 14व्या विधानसभेच्या 68 जागांसाठी 12 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते.

राज्यभरात 59 ठिकाणी उभारण्यात आलेल्या 68 केंद्रांवर मतमोजणी सुरू आहे. या मतमोजणीसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 10,000 सुरक्षा कर्मचारी, निवडणूक अधिकारी आणि इतर सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या तसेच सीसीटीव्हीच्या निगराणीखाली मतमोजणी केली जाणार आहे. काही मतमोजणी केंद्रांबाहेर सुरक्षा दलांकडून ड्रोनचाही वापर करण्यात येणार आहे.


हेही वाचा – हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस-भाजपामध्ये लढत; सध्याचे निकाल काय सांगतात?