(HMPV in India) नवी दिल्ली : ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (HMPV) भारतातही दाखल झाला आहे. कर्नाटक आणि गुजरातमध्ये एचएमपीव्हीचे गुजरात रुग्ण आढळल्याचे वृत्त आहे. कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये सोमवारी एचएमपीव्हीचा पहिला रुग्ण आढळला. अलीकडेच, दिल्ली आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये याबाबत सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. (Three cases of HMPV were found in India)
कर्नाटकात आतापर्यंत एचएमपीव्हीची दोन प्रकरणे नोंदवली गेली असल्याची माहिती आयसीएमआरने (Indian Council of Medical Research) दिली आहे. देशातील पहिलीच केस मानल्या जाणाऱ्या आठ महिन्यांच्या बालकावर बंगळुरूतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, या रुग्णाशी संबंधित कोणताही ट्रॅव्हल हिस्ट्री नाही. मुलाच्या वैद्यकीय चाचण्या पॉझिटिव्ह आल्याचे कर्नाटकच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. तथापि, चीनमध्ये पसरत असलेला एचएमपीव्हीचा हाच प्रकार आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हेही वाचा – HMPV : चीनमधील HMPVमुळे महाराष्ट्र आरोग्य विभाग अलर्ट मोडवर, मार्गदर्शक सूचना जारी
तर, बंगळुरूतीलच एका तीन महिन्यांच्या चिमुरडीला ब्रॉन्कोप्न्यूमोनियाच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी मुलीला एचएमपीव्ही असल्याचे निदान झाले. कर्नाटकप्रमाणेच गुजरातमध्येही एचएमपीव्हीचा रुग्ण आढळला आहे. अहमदाबादमध्ये एका दोन महिन्यांच्या बाळाची वैद्यकीय चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
महाराष्ट्र अलर्ट
एचएमपीव्हीसंदर्भात अनेक राज्यांमध्ये आरोग्य विभागाने नागरिकांसाठी परिपत्रक जारी केले आहे. महाराष्ट्रातील आरोग्य विभागही अलर्ट मोडवर आला आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने राज्यातील यंत्रणेसह नागरिकांसाठी एक परिपत्रक काढले असून यातून महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या नियमावलीनुसार, जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका, असे सांगण्यात आले आहे. तर, साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा. ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा. भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा आणि संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन (व्हेंटीलेशन) होईल, याची दक्षता घ्या, असे म्हटले आहे. (HMPV in India: Three cases of HMPV were found in India)
हेही वाचा – BJP Vs SS UBT : मोदींचा साधेपणा ‘मातोश्री टू‘ बांधणाऱ्या…, बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार