घरराजकारणगुजरात निवडणूकदिल्ली, हिमाचलचे निकाल विरोधकांसाठी आशादायी, पण एकजूट होणार का?

दिल्ली, हिमाचलचे निकाल विरोधकांसाठी आशादायी, पण एकजूट होणार का?

Subscribe

Opposition Parties | विरोधी पक्ष गेल्या आठ वर्षांपासून भाजपाविरोधात एकजूट होण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, विचारधारा आणि राजकीय स्पर्धेमुळे देशातील सर्व विरोधी पक्ष अद्यापही एकत्र येऊ शकलेले नाहीत. सर्वच बाजूने खिळखिळी झालेली असतानाही काँग्रेसलाच विरोधकांचं नेतृत्त्व करण्याची असलेली महत्त्वाकांक्षा विरोधी पक्षांच्या मतभेदाचं कारण आहे.

नवी दिल्ली – गेल्या दोन दिवसांतील विविध निवडणूक निकालांचे कल पाहता गुजरातमध्ये भाजपाला मिळालेला कौल ऐतिहासिक आणि अभूतपूर्व आहे. मात्र, असं असलं तरीही दिल्ली महानगरपालिका आणि हिमाचल प्रदेशची सत्ता भाजपाला राखता आली नाही. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपाशासित राज्यात सत्ताबदल करण्यासाठी विरोधी पक्ष आशावादी आहे. मात्र, यासाठी देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकजूट होण्याची गरज आहे, असं राजकीय तज्ज्ञांचं मत आहे. परंतु, विरोधी पक्षांमधील अंतर्गत वाद शमत नसल्याने भाजपामुक्त भारत करण्याच्या त्यांच्याच स्वप्नांना खिळ बसण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – गुजरातमध्ये मतदानाची टक्केवारी घसरली, तरीही भाजपाची मतं वाढली

- Advertisement -

दिल्ली महानगर पालिका, गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निकालाप्रमामेच सहा राज्यातील पोटनिवडणुकींचाही कल काल हाती आला. यामध्येही भाजपाला म्हणावे तसे यश मिळाले नाही. बिहारमधील एका जागेवरच भाजपाला यश संपादित करता आले. त्यामुळे पोटनिवडणुकीच्या निकालात विरोधी पक्षांनी चांगली मुसंडी मारली. पोटनिवडणुकांबाबत बिहारमध्ये नितीश कुमार यांना झटका बसला आहे. उत्तर प्रदेशमध्ये मैनपुरी लोकसभा आणि रामपूरव व खतौली विधानसभांमध्ये पोटनिवडणुका झाल्या होत्या. त्यापैकी मैनपुरी लोकसभा आणि खतौली विधानसभेतीन सपाचे उमेदवार जिंकून आले. तर, रामपूर विधानसभेतून भाजपाला यश मिळालं आहे. म्हणजेच, तीनपैकी एकाच जागेवर भाजपाला वर्चस्व प्रस्थापित करता आलं. ओदिसा, राजस्थान आणि छत्तीसगढमध्येही विरोधी पक्षांना विजय मिळवता आला आहे.

भाजपाच्या हातून दिल्ली आणि हिमाचल प्रदेशची सत्ता गेली असली तरीही गुजरातमधील यशाने भाजपाने संतुलन राखले आहे. हिमाचल प्रदेशमध्ये दरवेळी नवी सत्ता स्थापन होण्याची परंपरा असली तरीही येथील भाजपाची हार डोळेझाक करता येणार नाही. कारण, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे हिमाचलचे असूनही त्यांना आपला गड राखता आला नाही. तसंच, केरळ आणि उत्तराखंडमध्येही सत्ताबदल होण्याची परंपरा होती. मात्र, ही परंपरा या दोन्ही राज्यांतही खंडीत झाली आहे. त्यामुळे हिमाचलमध्येही ही परंपरा खंडीत करणे भाजपाला शक्य झालं असतं.

- Advertisement -

हेही वाचा – मोदी आणि शहा यांनी हरलेली गावं जिंकून दाखवली

विरोधी पक्ष गेल्या आठ वर्षांपासून भाजपाविरोधात एकजूट होण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, विचारधारा आणि राजकीय स्पर्धेमुळे देशातील सर्व विरोधी पक्ष अद्यापही एकत्र येऊ शकलेले नाहीत. सर्वच बाजूने खिळखिळी झालेली असतानाही काँग्रेसलाच विरोधकांचं नेतृत्त्व करण्याची असलेली महत्त्वाकांक्षा विरोधी पक्षांच्या मतभेदाचं कारण आहे. तर, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल आणि के.चंद्रशेखर राव हे गैरकाँग्रेस आणि गैरभाजपा पक्षांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. देश भाजपामुक्त व्हावा अशी प्रत्येक विरोधी पक्षाची इच्छा असली तरीही यासाठी कोणीही एकत्र येत नाही. प्रत्येक विरोधी पक्ष आप-आपल्या पद्धतीने भाजपाला शमवण्याचा प्रयत्न करतोय. केंद्रात सत्ता स्थापन करण्याची संधी मिळावी या हेतुनेच विरोधी पक्ष एकत्र येण्यास इच्छुक नसल्याचं म्हटलं जातंय.

अल्पावधीत दोन राज्यांत आणि एका महापालिकेत सत्ता स्थापन करणाऱ्या आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल विरोधी पक्षांच्या एकत्रीकरणाच्या विरोधात आहेत. तर, स्थानिक पक्षाच्या नेतृत्वात आता काँग्रेसने निवडणूक लढवावी अशी इच्छा ममता बॅनर्जी, केसीआर आणि शरद पवार यांची आहे. तसंच, सर्व जुन्या समाजवादी पक्षांना एकत्र करून आपली राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी नितीश कुमार प्रयत्नशील आहेत.

हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा धुराळा उडालेला असताना काँग्रेसचे राहुल गांधी भारत जोडो यात्रेत व्यस्त होते. भारत जोडो यात्रेला दोन दिवसांचा ब्रेक देत राहुल गांधी गुजरातला गेले होते. मात्र, गुजरातमध्ये त्यांची जादू फारशी चालली नाही. त्यातच, गुजरातमध्ये आपनेही प्रचाराचा धडाका लावल्याने गुजरातमध्ये यंदा तिहेरी लढत झाली. यामुळे तिन्ही पक्षांत मते विभागली जाऊन काँग्रेसला फटला बसला. त्यामुळे आम आदमी पक्षामुळे काँग्रेस पराभूत झाल्याचं मत राजकीय विश्लेषक मांडत आहेत. त्यामुळे केंद्रात सत्ता स्थापन करायची असेल तर या दोन्ही पक्षांना एकत्र येणं गरजेचं राहणार आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -