नागपुरात स्वदेशी Covaxin बनवण्यासाठी २० मकाक माकडांची मदत, ICMR महासंचालकांनी सांगितली लसी निर्मितीमागची रंजक कथा

How Monkeys were Tracked for Bharat Biotech’s COVID-19 Vaccine Covaxin Trial
नागपुरात स्वदेशी Covaxin बनवण्यात २० मकाक माकडांची मदत, ICMR महासंचालकांनी सांगितली लसी निर्मिती मागची रंजक कथा

भारताच्या स्वदेशी कोरोनाविरोधी लस कोवॅक्सिनला जगातील अनेक देशांनी मंजुरी दिली आहे. याशिवाय WHO ने देखील कोवॅक्सिन लसीला आपत्कालीन वापराच्या लसींच्या यादीत स्थान दिले. त्यामुळे जगभरातील अनेक देश या लसीचा वापर करु शकतात. मात्र कोवॅक्सिन लसी निर्मिती मागे एका प्रजातीच्या माकडांनी मदत केल्याची गोष्ट तुम्हाला माहित आहे का? होय, खरं आहे. कोवॅक्सिनच्या ट्रायलमध्ये रिसस मकाक प्रजातीच्या माकडांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. ‘गोइंग व्हायरल : मेकिंग ऑफ कोव्हॅक्सिन (Making of Covaxin) द इनसाईड स्टोरी’ या पुस्तकात यागोष्टीची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या पुस्तकात इंडियन काँन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी भारतातील कोवॅक्सिन या स्वदेशी लस बनवण्यामागची प्रक्रिया, चाचणी आणि मान्यता याबाबत अनेक रंजक गोष्टींचा उलघडा केला आहे.

या पुस्तकात ICMR महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी कोरोना साथीच्या काळातील भारतीय शास्त्रज्ञांसमोरील आव्हाने, लस तयार करण्यासाठीच्या प्रयोगशाळा आणि त्याचे जाळे, निदान, उपचार आणि सिरोसर्व्हेपर्यंतचे नवीन तंत्रज्ञान यासह अनेक महत्त्वाच्या गोष्टींची माहिती देण्यात आली आहे. यावर डॉ. भार्गव यांनी सांगितले की, या लस निर्मिती मागच्या यशोगाथेमागील नायक फक्त मनुष्य नाही तर यात २० माकडांचेही योगदान आहे. ज्यांच्यामुळे आपल्यापैकी लाखो लोकांना आता जीवनरक्षक लस मिळाली आहे.

या पुस्तकात त्यांनी पुढे सांगितले की, आम्ही या टप्प्यावर पोहचलो जिथे आम्हाला माहित होते की लस लहान प्राण्यांमध्ये अँटीबॉडीज तयार करु शकतात. मात्र यातील पुढचा टप्पा होता माकडासारख्या मोठ्या प्राण्यांवर चाचणी करणं हा होता. ज्यांच्या शरीराची रचना आणि रोगप्रतिकारक शक्ती माणसांसारखीच असते. यासाठी जगभरात विविध वैद्यकीय संशोधनासाठी रीसस मकाक माकड ही प्रजाती सर्वोत्तम मानली जाते.

या लसनिर्मिती मागणी कथा सांगताना डॉ. भार्गव म्हणाले की, ICMR नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीची लेव्हल ४ ची प्रयोगशाळा आहे. ज्यात प्राइमेट अभ्यासासाठी भारतातील एकमेव अत्याधुनिक सुविधा आहेत. मात्र कोरोना महामारीमध्ये पुन्हा एकदा संशोधनाचे आव्हान या प्रयोगशाळेतून स्वीकारले. मात्र या लस निर्मितीसाठी रीसस मकाक माकडे आणायची कुठून असा प्रश्न होता. कारण भारतात प्रयोगशाळांमध्ये रीसस मकाक माकडांची पैदास होत नाही. यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या संशोधकांनी भारतातील अनेक प्राणीसंग्रहालय आणि संस्थांशी संपर्क साधला. यासाठी तरुण माकडांची गरज होती ज्यांच्या शरीरात चांगली अँटीबॉडी असेल.

दरम्यान या लसीच्या चाचणीसाठी ICMR-NIV च्या टीमने राज्यातील काही भागांत माकडांना ओळखण्यासाठी आणि पकडण्यासाठी भेट दिली. मात्र लॉकडाऊनमध्ये या माकडांसमोर अन्नाचे संकट निर्माण झाल्याने ही माकडं घनदाट जंगलांमध्ये राहत होती. त्यामुळे माकडांचा शोध घेणे अवघड झाले. यावेळी शास्त्रज्ञांच्या मदतीसाठी महाराष्ट्र वनविभाग धावून आले, वनविभागाने जंगलांचे स्कॅनिंग करून नागपुरातील माकडांचा शोध घेतला आणि अशा प्रकारे माकडांवरील ट्रायल पूर्ण झाले.