Covid-19: कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक धोकादायक! जाणून घ्या…

Significant increase in deaths of corona patients in Thane district; 52 patients died and 5411 new patients
ठाणे जि्ल्ह्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूमध्ये लक्षणीय वाढ

कोरोनाच्या सध्याच्या लाटेने संपूर्ण देशात थैमान घातले आहे. गेल्या २४ तासांत देशभरात २ लाख ७३ हजाराहून अधिक नव्या कोरोना बाधित रूग्णांची नोंद करण्यात आली आहे, तर याच कालावधीत १ हजार ६१९ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या १२ दिवसांत नवे बाधित रूग्ण आढळण्याचे प्रमाण दुप्पट झाले आहे. १० राज्यात ७८ टक्क्यांहून अधिक नव्या रूग्णांची नोंद करण्यात आल्याचे समोर येत आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाची दुसरी लाट अधिक धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे.

दुसऱ्या लाटेत रोज ५० हजार बाधितांची नोंद

दरम्यान, देशात असलेली कोरोनाची दुसरी लाट कधी थांबेल याबद्दल तज्ज्ञांचे भिन्न मतं आहे. सेल्युलर अणि आण्विक जीवशास्त्र केंद्राचे संचालक डॉ. राकेश मिश्रा यांच्या मते, पुढील तीन आठवडे देशासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. यावेळी नागरिकांनी कोरोनाचा गांभीर्याने विचार करून कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे. या दुसऱ्या लाटेत गेल्या काही दिवसांपासून देशात रोज ५० हजार रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही भितीचं वातावरण आहे. पूर्णतः लॉकडाऊन नसल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या अधिकच वाढताना दिसत आहे.

पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयंकर

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान, जर रुग्णालयात बेड, ऑक्सिजन आणि लसांची कमतरता कायम राहिली तर देशात आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होऊ शकते. डॉ. मिश्रा यांच्या मते, पुढील तीन आठवडे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. लोकांना खबरदारी घ्यावी लागेल. इटलीमध्ये रूग्णालयात रुग्णांना ऑक्सिजन वेळीच मिळत नसल्याने तसेच उपचाराअभावी रुग्णालयांच्या कॉरिडॉरमध्येच लोकांचा मृत्यू झाला. अशीच परिस्थितीत देशात सध्या सुरू असल्याचे चित्र दिसतेय. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयंकर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतातील वाढत्या रुग्णसंख्येमागे डबल म्युटेशन स्ट्रेनचा कोरोना असल्याचा दावा आता करण्यात येतोय. गेल्या आठवड्यात भारतीय वैज्ञानिकांनी जीनोम सिक्वेन्सिंगचा एक डेटा जमा केला होता. त्यामध्ये २४ टक्के नव्या रुग्णांमध्ये कोरोनाच्या डबल म्युटेशनचा स्ट्रेन आढळल्याचे सांगितले जात आहे.

देशातील रुग्णसंख्येच्या ६५ टक्के रुग्ण महाराष्ट्रात

सध्या महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचे संकेत दिसत आहेत. मात्र, संपूर्ण भारतात कोरोना व्हायरसची अशीच भयानक परिस्थिती राहिली तर देशात मोठा कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि युरोपातील आकडेवारीचा विचार केला तर भारतातील कोरोनाची दुसरी लाट अधिक जीवघेणी असल्याचे सांगितले जात आहे. ज्या देशांमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट आली आहे, तिथे अधिक परिस्थिती चिंताजनक आहे. भारतात आता कोरोनाने पुन्हा गतीने डोकं वर काढलं आहे. महाराष्ट्रात तर सगळ्यात वाईट परिस्थिती उद्भवली असून एकूण देशातील रुग्णसंख्येच्या ६५ टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत.

तसेच देशात महाराष्ट्र, केरळ, गुजरात, पंजाब, कर्नाटकात ७० टक्क्याहून अधिक कोरोना केसेस आहेत. या राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या अत्यंत वेगाने वाढत असून ही चिंतेची बाब आहे. केवळ कोरोना रुग्णांची संख्याच वाढत नाहीये तर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्याही प्रचंड आहे. डिसेंबरनंतर पहिल्यांदाचा कोरोना बळींची संख्या वाढताना दिसत आहे. गेल्या आठवड्यापासून देशात २०० हून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून हा आकडा अधिक वाढताना दिसत आहे. देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला नसल्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. काही राज्यात कठोर निर्बंध लादले जात आहेत. तर कोरोना लसीकरणाच्या मोहिमेचा वेगही मंदावला आहे. त्यामुळेही कोरोनाची दुसरी लाट अधिक धोकादायक असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.