Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश विज्ञानाचा मार्ग सोडून विकास कसा होणार? ठाकरे गटाची मोदी सरकारवर टीका

विज्ञानाचा मार्ग सोडून विकास कसा होणार? ठाकरे गटाची मोदी सरकारवर टीका

Subscribe

मुंबई : नव्या संसद भवनाचे (New parliament building) उद्घाटन वैदिक विधीनुसार (Vedic ritual) झाले. विज्ञान, संशोधन न मानणाऱ्या लोकांच्या गराड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आले, त्यांनी धर्मकांड केले. यास हिंदुत्व म्हणावे की, राज्याभिषेकाचा सोहळा? भारतीय संसदेचे हे कोणते रूप आपण जगाला दाखवत आहोत? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांना आमंत्रण नाही, पण असंख्य साधू व मठाधीशांना नव्या संसद महालाच्या वास्तुशांतीस बोलावण्यात आले. पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, ‘‘नवे संसद भवन म्हणजे लोकशाहीचे मंदिर आहे. हे मंदिर भारताच्या विकासाचा मार्ग बळकट करून कोट्यवधी जनतेला सामर्थ्य देवो!’’ पण संसदेचा ‘कैलास’ करून, विज्ञानाचा मार्ग सोडून विकास कसा होणार? असा थेट सवाल ठाकरे गटाने केला आहे.

नव्या संसद भवनाच्या इमारतीचे उद्घाटन भव्य स्वरूपात पार पडले. हा सोहळा म्हणजे ‘सब कुछ मोदी आणि फक्त मोदी’ असाच होता. फोटो व इतर चित्रीकरणात दुसऱ्या कुणाची सावलीही मोदी यांनी येऊ दिली नाही. मोदींचा तो स्वभाव आहे. माणसाच्या स्वभावाला औषध नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदी हे असेच का वागतात? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे कष्ट कोणी घेऊ नयेत, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ‘सामना’ दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.

आपला स्वभाव बदलतील ते मोदी कसले?

- Advertisement -

राष्ट्रपतींनी नव्या संसद भवनाचे उद्घाटन केले असते, त्यांच्याबरोबर लोकसभेचे अध्यक्ष व राज्यसभेचे सभापती, दोघांच्या मधोमध पंतप्रधान मोदी व त्यांच्या उजव्या बाजूला विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे असे चित्र त्या लोकशाहीच्या मंदिरात दिसले असते तर मोदींचे मोठेपण कमी झाले नसते. मोदींनी हे सर्व घडवून आणले असते तर, मोदी बदलले असेच जगाला वाटले असते, पण आपला स्वभाव बदलतील ते मोदी कसले? अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

मोदी हे मोदींसारखेच वागतात. तसेच ते वागले. राष्ट्रपती नाहीत, उपराष्ट्रपती नाहीत, विरोधी पक्षनेते नाहीत. लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांना नाइलाजाने बाजूला ठेवले. ‘‘नव्या संसदेचे उद्घाटन होत आहे हो।s।s’’ अशी निमंत्रणाची हाळी मारण्यासाठी कोणीतरी हवे म्हणून ओम बिर्ला साहेब होते. तर, असा हा एकंदरीत कारभार आहे, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.

आठ वर्षांत संसदेस टाळे ठोकले!

- Advertisement -

मोदी हे 2014मध्ये देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी स्वतःच जाहीर केले होते की, ‘‘देशाचे संविधान हाच एकमेव पवित्र ग्रंथ आहे. त्या पवित्र ग्रंथाचा आदर आपले सरकार करेल.’’ मोदी यांनी पंतप्रधानपदावर येण्याआधी प्रथम संसदेत प्रवेश केला, तेव्हा अत्यंत भावूक होत संसदेच्या पायरीवर डोके टेकवून अश्रू ढाळले. या संसदेचे पावित्र्य राखीन, सगळ्यांना समान न्याय देईन व त्यासाठी संसदेला बळ देईन, असे त्यांचे मन त्यांना सांगत असावे, पण फक्त आठ वर्षांत त्यांनी त्याच संसदेस टाळे ठोकले व आपल्या मर्जीने संसदेची नवी इमारत उभी केली, असे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

लहरी राजाच्या इच्छेखातर बांधला ‘महाल’

एखाद्या महाराजाने आपल्या राजमहालाचा वास्तुप्रवेश करावा तसा त्याच्या उद्घाटनाचा सोहळा केला. लोकशाहीच्या या मंदिरातून राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष व राज्यसभेचे विरोधी पक्षनेते अदृश्य होते. मग त्या उद्घाटन सोहळ्यास कोण उपस्थित होते? नव्या संसद भवनाच्या सोहळ्यात ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान यांना फाटा देऊन अंधश्रद्धा, धर्मकांड यांना महत्त्व देणाऱ्यांचा भरणा होता. एक हजार कोटींचा ‘महाल’ लहरी राजाच्या इच्छेखातर बनवण्यात आला व त्यातून लोकशाहीच हद्दपार झाली अशी नोंद इतिहासात होईल, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

- Advertisment -