घरदेश-विदेशहैदराबादमधील एन्काऊंटरविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका; सोमवारी सुनावणी

हैदराबादमधील एन्काऊंटरविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका; सोमवारी सुनावणी

Subscribe

हैदराबाद पोलिसांनी बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या केलेल्या एन्काऊंटरचा निषेध करत याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

२७ नोव्हेंबरला हैदराबादच्या शादबाग परिसरामध्ये एका डॉक्टर तरुणीवर झालेल्या सामुहिक बलात्कार आणि त्यांनंतर तिला जाळून टाकल्याच्या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वेगाने पावलं उचलंत चार आरोपींना अटक देखील केली. मात्र, शुक्रवारी पहाटे घटनास्थळावर आढावा घेण्यासाठी आरोपींसह पोहोचलेल्या पोलिसांना चकवा देऊन आरोपी पळाले आणि नाईलाजाने स्वसंरक्षणासाठी त्यांच्यावर केलेल्या गोळीबारात आरोपींचा मृत्यू झाला अशी माहिती हैदराबाद पोलिसांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. हैदराबाद पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरचं मोठ्या प्रमाणावर कौतुक होत असतानाच काही ठिकाणी या कृतीवर आक्षेप देखील घेण्यात आला आहे. त्यासाठीच आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. हैदराबाद पोलिसांनी केलेलं कृत्य हे बेकायदा असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या याचिकेमध्ये करण्यात आली आहे. येत्या सोमवारी म्हणजेच ९ डिसेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे. हैदराबाज उच्च न्यायालयात देखील या प्रकरणाची सुनावणी सुरू असून सर्व मृत आरोपींचे मृतदेह ९ डिसेंबरला संध्याकाळी ८ वाजेपर्यंत जतन करून ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.


हेही वाचा – (फेक?) एन्काऊंटरचं भूत…!

शुक्रवारी पहाटे घटनास्थळावर जाऊन पोलिसांनी गुन्हा कसा घडला, हे आरोपींना सांगायला लावलं. या दरम्यान, आरोपींनी पळून जायच्या उद्देशाने पोलिसांवर काठ्या आणि दगडांनी हल्ला केला. शिवाय दोन पोलिसांच्या बंदुका घेऊन त्यांच्यावर गोळीबार देखील सुरू केला. त्यामुळे पोलिसांना स्वसंरक्षणासाठी प्रत्युत्तर द्यावं लागलं. यामध्येच या चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती हैदराबाद पोलिसांनी शुक्रवारी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितली. त्यानंतर पोलिसांच्या या कृत्याचं समर्थन करणाऱ्यांनी देशात अनेक ठिकाणी जल्लोष केला. मात्र, अशा प्रकारे न्यायालयाच्या बाहेर आरोपींना शिक्षा देणं बेकायदा असल्याची टीका केली गेली. त्यावरून मोठी चर्चा आता सुरू झाली असून त्याचा निकाल आता येत्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, या एन्काऊंटरमध्ये अनेक संशयास्पद गोष्टी घडल्याचा देखील दावा करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -