घरदेश-विदेशसूड हा कधीही न्याय होऊ शकत नाही - सरन्यायाधीश शरद बोबडे

सूड हा कधीही न्याय होऊ शकत नाही – सरन्यायाधीश शरद बोबडे

Subscribe

देशाचे मुख्य न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी हैदराबादमध्ये झालेल्या एन्काऊंटर प्रकरण आणि त्यानंतर देशवासीयांचा त्याला मिळणारा पाठिंबा यावर महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे.

हैदराबादमध्ये झालेल्या पशुवैद्यक तरुणीवरील सामुहिक बलात्कार प्रकरणावरून सध्या देशभर मोठी चर्चा सुरू झाली आहे. या गुन्ह्यातील चारही आरोपींना हैदराबाद पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात मृत्यू आला. या प्रकरणावरून सध्या हैदराबाद पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पोलिसांनी आरोपींना गोळ्या घालून मारलं हे बरोबरच केलं अशा शब्दांत त्यांच्या कृतीचं समर्थन केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर देशाचे सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे यांनी मात्र या प्रकरणात वेगळी भूमिका मांडली आहे. ‘न्याय अगदी लगेच मिळणं शक्य नसतं. आणि न्यायाचं रुपांतर सुडामध्ये कधीही होऊ नये. करण सूड कधीही न्याय देऊ शकत नाही. जेव्हा न्यायाचं रुपांतर सूडामध्ये होतं, तेव्हा त्याचं न्याय म्हणून अस्तित्व संपुष्टात येतं’, असं न्या. बोबडे म्हणाले आहेत. राजस्थानच्या जोधपूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

- Advertisement -

‘दिरंगाई ही न्यायव्यवस्थेसमोरची समस्या’

दरम्यान, यावेळी बोलताना न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी न्यायदान प्रक्रियेत होणाऱ्या दिरंगाईवर देखील बोट ठेवलं आहे. ‘गेल्या काही दिवसांमध्ये देशभरात घडलेल्या घटनांमधून एका जुन्याच मुद्द्याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणामध्ये न्यायदान करताना होणाऱ्या दिरंगाईबद्दल न्यायव्यवस्थेने पुन्हा एकदा विचार करणं आवश्यक आहे. दिरंगाईबद्दलच्या मुद्द्याकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलावा लागेल’, असं बोबडे यांनी यावेळी नमूद केलं. न्यायदान प्रक्रियेमध्ये होणाऱ्या दिरंगाईमुळेच हैदराबाद पोलिसांनी केलेल्या कृत्याचं समर्थन केलं जात असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

हैदराबाद पोलिसांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

दरम्यान, हैदराबाद पोलिसांनी आरोपींच्या केलेल्या एन्काऊंटरविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ‘पोलिसांनी केलेलं कृत्य बेकायदा होतं. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा. कारवाई व्हायला हवी’, अशी मागणी या याचिकेमध्ये करण्यात आली आहे. येत्या सोमवारी म्हणजेच ९ डिसेंबर रोजी या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.


हेही वाचा – एन्काऊंटरविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका; सोमवारी सुनावणी
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -