५२ वर्षांपासून माझ्याकडे घर नाही, १९७७ सालच्या घटनेमुळे राहुल गांधी भावूक

Rahul Gandhi Emotional Speech | राहुल गांधी यांनी त्यांच्यासोबत १९७७ साली घडलेली एक भावूक घटना शेअर केली. यानिमित्ताने राहुल गांधी यांच्यातील घराबाबतचे मत स्पष्ट झाले. त्यांच्या लेखी घर काय आहे हे त्यांनी या निमित्ताने शेअर केलं आहे. 

rahul gandhi

Rahul Gandhi Emotional Speech | रायपूर – भारत जोडो यात्रेअंतर्गत जनतेसोबत संवाद साधल्यानंतर राहुल गांधी यांनी आज काँग्रेसच्या अधिवेशनातूनही जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी त्यांच्यासोबत १९७७ साली घडलेली एक भावूक घटना शेअर केली. यानिमित्ताने राहुल गांधी यांचे घराबाबतचे मत स्पष्ट झाले. तसंच, त्यांच्यालेखी घर काय आहे, घराबाबतच्या संकल्पना काय आहेत? हे त्यांनी या निमित्ताने शेअर केलं आहे.

राहुल गांधी म्हणाले की, “१९७७ सालची गोष्ट आहे. निवडणुका लागल्या होत्या. तेव्हा मला निवडणुकांमधलं काही कळायचं नाही. मी सहा वर्षांचा होतो. एकदा घरात वेगळं वातावरण होतं. त्यामुळे मी आईला विचारलं की, ‘मम्मी, काय झालं?’ आई म्हणाली, ‘आपण घर सोडतोय.’ मी विचारलं की, ‘आपण घर का सोडतोय?’ तेव्हा मला पहिल्यांदा कळलं की हे आपलं घर नाहीय. हे सरकारचं घर आहे. आता आपल्याला येथून जायचं आहे. मी आईला विचारलं की, ‘आई कुठे जायचं आहे?’ तेव्हा ती म्हणाली की, ‘नाही माहिती कुठे जायचं.’ मी हैरान झालो. मी विचार केला होता की ते आमचं घर आहे. तेव्हापासून आमच्याकडे घर नाही. 52 वर्षे झाली, माझ्याकडे घर नाही. आमच्या कुटुंबाचं घर अलाहाबाद येथे आहे. पण तेही आमचं घर नाही. त्यामुळे जे घर असतं त्यासोबत माझं वेगळं नातं असतं.”

“मी बारा तुघलक लेनमध्ये राहतो. पण ते माझ्यासाठी घर नाही. त्यामुळे मी भारत जोडो यात्रेसाठी जेव्हा कन्याकुमारीपासून निघालो. मी स्वतःला विचारलं की माझी जबाबदारी काय आहे? मी भारताचं दर्शन करायला निघालो आहे, भारताला समजण्यासाठी निघालो आहे. हजारो लाखो लोक माझ्यासोबत चालताहेत. गर्दी आहे. मग माझी काय जबाबदारी आहे? मी थोडावेळ विचार केला. मला कल्पना सुचली. पुढच्या चार महिन्यांसाठी हे माझ्यासाठी घर आहे. हे घर माझ्यासोबत चालेल. सकाळी सहा वाजल्यापासून सायंकाळपर्यंत हे घर माझ्यासोबत चालेल. या घरात जो कोणी येईल गरीब, श्रीमंत, अबालवृद्ध, कोणत्याही र्धमाचा, राज्याचा असो, भारताबाहेरील असो, प्राणी असो, त्याला हे वाटलं पाहिजे की मी आज माझ्या घरी आलो आहे. जेव्हा ते येथून जातील तेव्हा त्याला वाटलं पाहिजे की मी माझ्या घराला सोडून जातोय. ही फार लहान कल्पना होती. पण त्याचं महत्त्वं मला मी यात्रा सुरू केल्यानंतर समजलं,” असंही राहुल गांधी म्हणाले.