Shashi Tharoor On Congress : नवी दिल्ली : कॉंग्रेसचे ज्येष्ठ खासदार आणि कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणारे शशी थरूर आणि पक्षाचे संबंध सध्या ताणलेले आहेत. अशातच थरूर यांच्या एका वक्तव्याने हे संबंध पुरतेच बिघडण्याची शक्यता आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत थरूर म्हणाले की, माझ्यासमोर अनेक पर्याय आहेत. शशी थरूर यांच्याकडे कोणताही पर्याय उपलब्ध नाही असे पक्षाला वाटता कामा नये. थरूर यांच्या या विधानानंतर हा वाद अधिकच पेटण्याची चिन्हे आहेत. (i have options shashi tharoor big statement amid deteriorating relations with congress)
शशी थरूर आणि पक्षातील वाद यांच्यातील नाते जुने आहे. मात्र, काही दिवसांपासून हे वाद अधिक तीव्र झाल्याचे दिसते आहे. नुकतीच त्यांनी कॉंग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांची भेट घेतली. पक्षात आपल्याला बाजूला ठेवले जात असल्याबद्दल त्यांनी या भेटीत नाराजी व्यक्त केल्याचे त्यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर त्यांचे हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.
हेही वाचा – Rokhthok : आज भयाचे सावट कुणावर नाही? संजय राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
थिरूवनंतपूरम येथून सलग चौथ्यांदा शशी थरूर हे खासदार म्हणून निवडून आले आहेत. राज्य तसेच देशाच्या विकासात स्वतंत्ररित्या आपले विचार मांडण्याला लोकांचे समर्थन मिळत असते हे यातूनच सिद्ध होत असल्याचे थरूर म्हणाले. मी पक्षसेवेसाठी केव्हाही तयार आहे. पण जर पक्षाला गरज नसेल तर माझ्याकडे अन्य पर्यायही असल्याचे त्यांनी सांगितले.
या मुलाखतीत थरूर यांनी कॉंग्रेसमध्ये असलेल्या नेतृत्वाच्या अभावाबाबतही चिंता व्यक्त केली. पक्षात नेतृत्व नसणे, ही एक गंभीर समस्या आहे. जर कॉंग्रेस आपल्या नेहमीच्याच व्होटबॅंकेवर विसंबून राहिली तर त्यांना तिसऱ्यांदा केरळमध्ये विरोधी पक्षातच बसावं लागेल, असा टोलाही थरूर यांनी लगावला. कॉंग्रेसला राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर आपली विश्वासार्हता वाढवावी लागेल. कारण, आपली एकच एक व्होटबॅंक गृहीत धरून कॉंग्रेस कधीच सत्तेत येणार नाही.
मी कोणत्याही एका पद्धतीला बांधलेला नाही. मला अनेक गोष्टी आवडतात आणि पटतात. लोकांना देखील माझ्यातील हीच गोष्ट आवडत असावी, त्यामुळेच ते मला निवडून देत असावेत, असे थरूर म्हणाले. याच गोष्टीमुळे केरळमध्ये मी अन्य नेत्यांच्या तुलनेत आघाडीवर असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. जर पक्षाला माझा उपयोग करून घ्यायचा असेल तर मी पक्षासाठी नेहमीच हजर असेन. जर नको असेन तर माझ्याकडे माझे असे अनेक पर्याय आहेत.
हेही वाचा – Sanjay Raut : अटकेच्या भीतीनेच एकनाथ शिंदे कर्नाटकात गेले नाहीत, राऊतांचा दावा
दरम्यान, माझ्याकडे अनेक पर्याय आहेत असे सांगणाऱ्या थरूर यांनी आपण पक्ष सोडण्याचा विचार करत नसल्याचे सांगितले. जर पक्षात कोणाची मते वेगळी असतील, तर त्यांनी लगेच पक्ष सोडण्याचा विचार करता कामा नये, असे माझे मत आहे. माझ्यापुरते म्हणाल तर माझ्याकडे पुस्तके आहेत, भाषणाची आमंत्रणे आहेत. बाकीही अनेक कामे आहेत.
शशी थरूर यांच्याबाबतचे वाद काय?
चार वेळा खासदार असलेल्या शशी थरूर यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खरगे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. 2022 मध्ये त्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहिलेल्या G23 गटातही होते. या गटाने काँग्रेस नेतृत्व बदलण्याची मागणी केली होती. तसेच, शशी थरूर यांनी अनेकदा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस नेतृत्वाविषयी आपला असंतोष व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी, शशी थरूर यांनी इंग्रजी वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या लेखामध्ये केरळच्या पिनाराई विजयन सरकारचे कौतुक केले होते. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स आणि अमेरिका दौऱ्याचीही प्रशंसा केली होती. यामुळे काँग्रेस पक्षात वाद निर्माण झाला.