आयटीच्या रडारवर चित्रपटसृष्टी, ४० ठिकाणी छापेमारी, २०० कोटींहून अधिक बेहिशोबी रोकड जप्त

आयटीने आपला मोर्चा काळ्या पैशांची मोठ्या प्रमाणावर उलाढाल होणाऱ्या चित्रपटसृष्टीकडे वळवला आहे.

देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी ईडीबरोबरच आयटी आणि इतर सरकारी यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. आतापर्यंत या यंत्रणांच्या निशाण्यावर प्रामुख्याने राजकीय व्यक्ती, व्यावसाय़िक आणि छोटे व्यापारी होते. पण आता आयटीने आपला मोर्चा काळ्या पैशांची मोठ्या प्रमाणावर उलाढाल होणाऱ्या चित्रपटसृष्टीकडे वळवला आहे. याचपार्श्वभूमीवर, २ ऑगस्ट रोजी चित्रपट निर्माते , वितरक आणि वित्त पुरवठादारांचे कार्यालय अशा ४० ठिकाणांवर आयटी विभागाने धाडी टाकल्या. यात कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी रोकड जप्त करण्यात आली. हे धाडसत्र प्रामुख्याने दाक्षिणात्य चित्रपट चैन्नई, मदुराई, कोईम्बतूर आणि वैल्लूर येथे घालण्यात आल्या.

आयकर विभागानेच ही माहिती दिली असून या कारवाईत २०० कोटीहून अधिक रोकड जप्त करण्यात आल्याचे सांगितले आहे. या कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांच्या हाती बेहिशोबी पैशांच्या व्यवहारासंदर्भातील अनेक महत्वाचे दस्तावेज लागले आहेत. तसेच काही डायऱ्यांमध्ये वित्तपुरवठा करणाऱ्यांचे फोन नंबर आणि पत्तेही मिळाल्याचे आयकर अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान, विविध ठिकाणी करण्यात आलेल्या छापेमारीत २०० कोटींहून अधिक बेहिशोबी रक्कमही सापडली आहे. तसेच काही ठिकाणी सोन्याचे दागिण्यांसह कोट्यवधी रुपयांची रोकडही सापडली आहे.