ICMR चे उपकेंद्र लवकरच मुंबईत?

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन राज्याच्या दौऱ्यावर.

ICMR head office
ICMR चे दिल्ली येतील कार्यालय

देशभरातील कोरोनाच्या संसर्गापेक्षा महाराष्ट्रात आणि मुख्यत्वे मुबंई महानगर क्षेत्रात देशाच्या तुलनेपेक्षा दुपटीएवढा संसर्ग झाला आहे. त्यातच येणारा पावसाळा आणि त्या अनुषंगाने येणारे साथीचे आजार पाहता आता केंद्र सरकारही मुबंईकरांच्या आरोग्याच्या बाबतीत गंभीर झाले आहे. कोरोनो रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि देण्यात येणाऱ्या सुविधा यांची कमतरता दिसत असल्याने आता आयसीएमआरचे (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) उपकेंद्र मुंबईत बनविण्याबाबत केंद्र सरकारमध्ये एकवाक्यता झाली आहे.

आयसीएमआरचे उपकेंद्र मुंबईत झाले तर कोरोनाची लक्षणे नसलेल्या रुग्णांची न करण्यात येणारी चाचणी, मुबंईत उपलब्ध असेलेले बेड आणि डॉक्टरांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता यावर आयसीएमआरचे थेट नियंत्रण राहिल. त्यामुळे कोरोनाच्या बाबतीतली सर्व माहिती एकाच डॅशबोर्डवर उपलब्ध करण्याचा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा मानस असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.

राज्यात सध्या ५० हजारहून अधिक रुग्ण असून मुंबईतील आकडा ३० हजारांच्या घरात गेलेला आहे. आतापर्यंत राज्यात १६०० हून अधिक मृत्यू झाले असून त्यातील एक हजार मृत्यू हे एकट्या मुंबई महानगर क्षेत्रातीलच आहेत. मात्र मुंबईतील रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना आणि सुविधा यामध्ये फार मोठी तफावत असल्याने आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मुंबईवर लक्ष केंद्रीत करण्याचे ठरविले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन हे राज्याच्या दौऱ्यावर येणार असून ते राज्यातील कोरोनाग्रस्तांवरील करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि मुंबईतील परिस्थिती याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव अजोय मेहता, मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासोबत बैठक घेणार असल्याचे कळते.

रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधताना हा आठवडा खूपच धोक्याचा असून जास्तीत जास्त काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. जर आपण लॉकडाऊन केला नसता तर राज्यातली रुग्णसंख्या सव्वा लाख ते दीड लाखांच्या घरात गेली असती याकडे त्यांनी लक्ष वेधले. सध्या मुबंई महापालिकेची सर्व प्रमुख रुग्णालये हे कोरोनाच्या रुग्णांनी हाऊसफुल झाली आहेत. तर खासगी रुग्णालयांकडे बेड शिल्लक नसल्यामुळे ते रुग्णांना दाखल करुन घेत नसल्याचा अनेकांचा अनुभव आहे. त्यामुळे आयसीएमआरची गाईडलाईन मुंबईत पाळली जात नसल्याने रुग्णांची संख्या कमी दाखविण्यात येत असून इतर आजारांमुळेच रुग्ण दगावतात, असे आता रुग्णांच्या निधनानंतर त्यांच्या मृत्यू दाखल्यावर लिहून दिले जात आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया आणि साथीचा आजाराचे रुग्ण वाढल्यास मुबंईची परिस्थिती हाताबाहेर जाईल, अशी भीती केंद्र सरकारला वाटत असल्याने मुंबईत आयसीएमआरचे उपकेंद्र बनवावे आणि WHO च्या निकषांनुसार कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जावे, याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे एकमत झालेले आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात मुंबईत आयसीएमआरचे उपकेंद्र बनेल आणि कोरोनाबाबतची सर्व इत्थंभूत माहिती ही आयसीएमआर संकलित करेल, असे आरोग्य खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आपलं महानगरला सांगितले.