घरदेश-विदेशअजून काही असेल तर हायकोर्टात जा...; सर्वोच्च न्यायालयाचा पहिलवानांना सल्ला

अजून काही असेल तर हायकोर्टात जा…; सर्वोच्च न्यायालयाचा पहिलवानांना सल्ला

Subscribe

नवी दिल्लीः भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख बृजभूषण सिंह यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पीडित महिला पहिलवानांना पोलीस सुरक्षा देण्यात आली आहे. त्यामुळे आता पहिलवानांच्या याचिकेत सुनावणी करावी असा कोणताचा मुद्दा शिल्लक राहिलेला नाही. परिणामी ही याचिका आम्ही निकाली काढत आहोत, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. पी. एस. नरसिम्हा व न्या. जे. बी. पारधीवाला यांच्या पूर्णपीठासमोर पहिलवानांच्या याचिकेवर सुनावणी सुरु होती. भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख बृजभूषण सिंह यांच्याविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवावा व पीडित महिला पैलवान यांना पोलीस सुरक्षा द्यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.

- Advertisement -

बृजभूषण सिंह यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला जाईल, अशी हमी दिल्ली पोलिसांनी न्यायालयात दिली. त्याची नोंद करुन घेत न्यायालयाने पीडित महिला पहिलवानांना सुरक्षा देण्याचे आदेश दिल्ली पोलिसांना दिले. त्यानंतर बृजभूषण सिंह यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा नोंदवण्यात आला. पोस्को अंतर्गतही बृजभूषण यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद बृजभूषण यांच्याविरोधात करण्यात आली आहे. यावर बृजभूषण सिंह यांनी प्रतिक्रिया दिली. या देशात कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही. मीही कायद्यापेक्षा मोठा नाही. मी तपासात सहकार्य करेन, असे बृजभूषण सिंह यांनी स्पष्ट केले.

गुन्हा नोंदवल्यानंतरही पहिलवान यांचे जंतर मंतर येथे आंदोलन सुरुच आहे. शांतपणे चाललेल्या या आंदोलनामध्ये कुस्तीपटू आणि दिल्ली पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाल्याचा प्रकार समोर आला आहे. बुधवारी (3 मे) रात्री झालेल्या धक्काबुक्कीत विनेश फोगाटच्या भावाच्या कपाळावर मोठी जखम झाली आहे. बुधवारी रात्री दारुच्या नशेत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने मारहाण केल्याचा आरोप कुस्तीपटूंनी केला आहे. दिल्लीत पडणाऱ्या पावसामुळे आम आदमी पार्टीचे नेते सोमनाथ भारती यांनी आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंसाठी फोल्डिंग बेड्स आणले होते, पण पोलिसांनी या बेड्सवर आक्षेप घेत कुस्तीपटूंना धक्काबुक्की केली. दिल्ली पोलीस कर्मचारी आणि आंदोलक कुस्तीपटू यांच्यातील गोंधळाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. बजरंग पुनिया याने आरोप केला आहे की, पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना आई-बहिणीवरुन शिवीगाळ केली, त्यांना मारहाण केली. मात्र कुस्तीपटूंच्या आरोपांवर दिल्ली पोलिसांनी अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -