घरCORONA UPDATEकोरोनाची लक्षणे आढळल्यास आता बदली खेळाडू मिळणार!

कोरोनाची लक्षणे आढळल्यास आता बदली खेळाडू मिळणार!

Subscribe

अनिल कुंबळे अध्यक्षीय आयसीसीच्या क्रिकेट समितीने पुन्हा क्रिकेट सुरु करण्यासाठी आयसीसीला काही शिफारसी केल्या होत्या.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मंगळवारी काही नव्या नियमांची घोषणा केली असून आता कसोटी सामन्यादरम्यान खेळाडूत कोरोनाची लक्षणे आढळल्यास संघांना बदली खेळाडू निवडण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच चेंडूला तकाकी आणण्यासाठी थुंकीच्या वापरावरही बंदी घालण्यात आली आहे. अनिल कुंबळे अध्यक्षीय आयसीसीच्या क्रिकेट समितीने पुन्हा क्रिकेट सुरु करण्यासाठी आयसीसीला काही शिफारसी केल्या होत्या. यापैकी पाच शिफारसींना आयसीसीने मान्यता दिली आहे.

कसोटी सामन्यादरम्यान खेळाडूंमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास संघांना बदली खेळाडू निवडण्याची परवानगी असेल. कन्क्शनच्या नियमांप्रमाणेच, सामनाधिकाऱ्यांच्या परवानगीने समान शैलीचा (फलंदाजाच्या जागी फलंदाज, गोलंदाजाच्या जागी गोलंदाज) बदली खेळाडू निवडण्याची संघांना परवानगी आहे. मात्र, एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये बदली खेळाडू निवडता येणार नाही, असे आयसीसीने आपल्या पत्रकात म्हटले.

- Advertisement -

थुंकीच्या वापरावर बंदी असली तरी गोलंदाजांना या बदलाशी जुळवून घेण्यासाठी वेळ लागू शकेल. त्यामुळे सुरुवातीला हा नियम सक्तीचा नसेल. संघांना दोनदा ताकीद दिली जाईल आणि पुन्हा ही कृती केल्यास दंड म्हणून फलंदाजी करणाऱ्या संघाला ५ धावा दिल्या जातील. त्याचप्रमाणे द्विपक्षीय कसोटी मालिकांसाठी स्थानिक पंचांचीच निवड केली जाईल आणि संघांना प्रत्येक डावात एक अतिरिक्त रिव्हियू दिला जाईल. तसेच कसोटी सामन्यांत संघांना आपल्या जर्सीवर एक अतिरिक्त ३२ इंचाचा लोगो लावण्याची परवानगीही देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -