नवी दिल्ली : उत्पादक आणि ग्राहकांच्या हितांच्या बाबतीत समतोल साधला गेला तरच लाभ देणारी बाजारपेठ टिकून राहू शकते आणि हेच तत्व देशांनाही लागू होते. उत्पादक देशांनी इतर देशांना केवळ बाजारपेठ मानूनच वाटचाल सुरू ठेवली तर त्यामुळे उत्पादक देशांचेही नुकसानच होईल. प्रगतीमध्ये सर्वांना समान भागीदार म्हणून समाविष्ट करून घेणे हाच पुढे वाटचाल करत राहण्याचा मार्ग आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, रविवारी केले. ग्राहक हा व्यक्ती असो वा देश; मात्र जगभरातील व्यवसाय-उद्योग ग्राहककेंद्री कसे होऊ शकतील याबद्दल या परिषदेत उपस्थित असलेल्या उद्योजकांनी विचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
Making everyone equal partners in progress is the way forward. pic.twitter.com/x2QF9rzXIK
— PMO India (@PMOIndia) August 27, 2023
पंतप्रधान मोदी यांनी आज, रविवारी नवी दिल्लीत बी-20 परिषद भारत 2023, या बैठकीला संबोधित केले. भारतातील या बी-20 परिषदेने, जगभरातील धोरणकर्ते, आघाडीचे व्यावसायिक-उद्योजक आणि तज्ञांना, बी-20 भारताच्या घोषणापत्रावर चर्चा आणि विचारमंथनासाठी एकत्र आणले आहे. जी-20मध्ये सादर करावयाच्या 54 शिफारशी आणि 172 धोरणात्मक कार्यवाहींचा या घोषणापत्रात समावेश आहे.
हेही वाचा – ‘शिवशक्ती’ आणि ‘तिरंगा’ नामकरणाबाबत इस्रोप्रमुख एस. सोमनाथ म्हणतात…
बैठकीतील उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांचा भर, चांद्रयानाने 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर केलेल्या यशस्वी लँडिंगचा आनंद साजरा करण्यावर होता. ते म्हणाले की, भारतात पारंपरिक सणउत्सवांना आता सुरुवात होत आहे. मात्र चांद्रयानाच्या यशाने सण आधीच साजरे होऊ लागले आहेत आणि समाज तसेच व्यवसायही उत्सवाच्याच मानसिकतेमध्ये आहेत. चांद्र मोहिमेतील इस्रोच्या कामगिरीचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी यांनी या मोहिमेतील उद्योगांच्या भूमिकेचे महत्त्व देखील अधोरेखित केले. चांद्रयानाच्या अनेक सुट्या भागांचा पुरवठा, खासगी क्षेत्र आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांनी केला आहे. हे विज्ञान आणि उद्योग या दोघांचेही यश आहे, असे ते म्हणाले.
हेही वाचा – ‘आज देश चंद्रावर चाललाय पण काही लोक घरात बसूनच’, मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा
भारताचे हे यश भारतासोबतच संपूर्ण जग साजरे करत आहे. जबाबदारी, गतिमानता, नवोन्मेष, शाश्वतता आणि समानता याचा हा उत्सव असून, ही आजच्या बी-20 ची संकल्पना आहे. ही संकल्पना मानवता आणि एक वसुंधरा, एक कुटुंब आणि एक भविष्य याबाबत आहे, असेही त्यांनी सांगितले.
कोविड-19 महामारीच्या संकटापासून धड्यांविषयी मोदी म्हणाले की, आपल्या गुंतवणुकीसाठी सगळ्यात जास्त आवश्यक गोष्ट कुठली असेल तर ती आहे परस्पर विश्वास, हे या महामारीने आपल्याला शिकवले आहे. या संकटाने परस्पर विश्वासाची इमारत डळमळीत केली असताना, भारत परस्पर विश्वासाचा ध्वज उंचावत, आत्मविश्वासाने आणि सहकार्याच्या भावनेने उभा राहिला. जगाचे औषधालय या आपल्या बिरुदाला जागत भारताने 150 हून अधिक देशांना औषधे उपलब्ध करून दिली. त्याचप्रमाणे कोट्यवधी लोकांचे प्राण वाचवण्यासाठी, भारताने लसीचे उत्पादन वाढवले. भारताची लोकशाही मूल्ये नेहमीच आपल्या कृतीतून आणि प्रतिसादातून दिसून येतात, असेही पंतप्रधानांनी सांगितले.