फोनमध्ये पेगासस होते तर…, राहुल गांधींच्या आरोपावर भाजपाचा पलटवार

नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठात आपल्यावरील हेरगिरीचा दावा करत पेगाससचा संदर्भ दिला होता. त्यावरून केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधींना पुन्हा एकदा परदेशात जाऊन हा विषय मांडण्याची काय गरज होती? पेगासस त्यांच्या फोनमध्ये नाही त्यांच्या डोक्यात आहे, असे ते म्हणाले. राहुल गांधी यांनी काल, गुरुवारी पेगाससबद्दल वक्तव्य करताना त्यांच्या फोनद्वारे त्यांची हेरगिरी केली जात असल्याचे म्हटले होते.

काँग्रेस आणि त्यांचे नेते परदेशात जाऊन देशाला बदनाम करण्याचे काम करत असल्याचा आरोप केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर करत राहुल गांधींवर निशाणा साधला. पेगासस त्यांच्या फोनमध्ये नाही तर त्यांच्या डोक्यात असल्याची टीका अनुराग ठाकूर यांनी केले. काल निवडणुकीचा जो निकाल जाहीर झाला, त्यावरून असे दिसते की, काँग्रेसचा सुपडासाफ झाला आहे. तरीही काँग्रेस जनादेश स्वीकारण्यास तयार नाही आणि या निकालांवरून हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले की, लोकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जास्त विश्वास आहे, असेही अनुराग ठाकूर म्हणाले.

राहुल गांधींच्या फोनमध्ये जर पेगासस होता तर त्यांनी सर्वोच्च न्यायालयाद्वारे स्थापन केलेल्या तांत्रिक समितीकडे आपला फोन का सादर केला नाही? असा प्रश्नही अनुराग ठाकूर यांनी उपस्थित केला. आपला फोन जमा करण्यात त्यांना नेमकी काय अडचण होती, हे राहुल गांधी यांनी सांगायला पाहिजे. काँग्रेसमधील इतर नेत्यांनी सुद्धा पेगाससबद्दल दावे केले, मात्र त्यापैकी कोणीही फोन जमा केला नाही, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा सन्मान वाढला आहे. प्रत्येक देशातील मोठे नेते हेच सांगत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल इटलीच्या पंतप्रधानांनी जे वक्तव्य केले ते राहुल गांधींनी ऐकले पाहिजे, असेही अनुराग ठाकूर यांनी सांगितले.

पेगाससद्वारे माझी हेरगिरी – राहुल गांधी
काँग्रेस खासदार राहुल गांधी काल लंडनच्या केंब्रिज विद्यापीठात एमबीएच्या विद्यार्थ्यांना व्याख्यान देण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या फोनद्वारे हेरगिरी होत असल्याचे सांगितले. माझी आणि विरोधी पक्षनेत्यांची पेगाससद्वारे हेरगिरी होत असल्याची माहिती गुप्तचर अधिकाऱ्यांनी मला दिली. त्यांनी मला सावधगिरी बाळगत फोनवर बोलण्याचा सल्ला दिल्याचे राहुल गांधी म्हणाले.