नवी दिल्ली : देशातील प्रतिष्ठित अशा आयआयटी संस्थेच्या धर्तीवर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT) मुंबईत गोरेगाव येथे उभारण्यात येईल आणि यासाठी केंद्र शासन 400 कोटी रूपयांची आर्थिक मदत करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. भारताच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राला जागतिक स्तरावर नेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या जागतिक दृक-श्राव्य मनोरंजन शिखर परिषदेच्या पहिल्या सत्राचे आयोजन सुषमा स्वराज भवन येथे करण्यात आले. या सत्रात मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही माहिती दिली. (IICT now in Mumbai says CM Devendra Fadnavis on his Delhi tour)
हेही वाचा : CM Fadanvis meet PM Modi : मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, झाली या विषयांवर चर्चा
जागतिक स्तरावर होणाऱ्या या पहिल्या परिषदेचे यजमानपद महाराष्ट्र राज्याला मिळाले असून, राज्यासाठी ही अभिमानाची बाब असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. तसेच याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. राज्याच्या आर्थिक राजधानीत 1 ते 4 मे 2025 दरम्यान मुंबईतील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे ही भव्य परिषद होणार आहे. शिखर परिषदेच्या पहिल्या सत्राचे आयोजन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने केले असून, या सत्रात विविध देशांच्या राजदूत आणि उच्चायुक्तांनी सहभाग घेतला.
मुंबईत IICT ची उभारणी
मुंबईमध्ये ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी’ (IICT)ची स्थापन करण्याची महत्त्वपूर्ण घोषणेची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी सवांद साधताना दिली . या संस्थेच्या माध्यमातून मुंबईला जागतिक क्रिएटिव्ह हब बनवण्याचा महत्त्वाकांक्षी उद्देश असून याबाबत, केंद्र शासन 400 कोटी रुपयांची आर्थिक सहायता देणार असल्याची माहितीही त्यांनी दिली . हा प्रकल्प केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता, संपूर्ण भारताच्या क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी क्षेत्रासाठी एक मैलाचा दगड ठरेल. मुंबईत उभारले जाणारी IICT फक्त एक शिक्षण संस्था नसून हे संपूर्ण क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी उद्योगाला नवीन दिशा देणारे केंद्र बनेल. ही संस्था नावीण्यपूर्ण आणि तंत्रज्ञानाच्या संगमातून भारताला जागतिक पातळीवर घेऊन जाईल.
मुंबई जागतिक स्तरावर क्रिएटिव्ह हब बनणार
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले , “मुंबई आधीच बॉलिवूड आणि मनोरंजन उद्योगाचे मोठे केंद्र आहे. मात्र, या नव्या संस्थेमुळे भारताच्या क्रिएटिव्ह इंडस्ट्रीला जागतिक दर्जाचे व्यासपीठ मिळणार आहे. जसे दावोस आर्थिक क्षेत्रासाठी महत्त्वाचे आहे. तसेच हे व्यासपीठ क्रिएटिव्ह तंत्रज्ञान क्षेत्रासाठी जागतिक ब्रँड उभारणारे ठरेल.”