नवी दिल्ली : चंदीगड महापौर निवडणुकीच्याबाबत सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. ज्यामुळे याचा फटका भाजपाला बसला आहे. चंदिगड महापौर निवडणुकीच्या मतांची फेरमोजणी करण्यात यावी, असे आदेश सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे आता जी आठ मते अवैध ठरविण्यात आली होती. ती आठ मते वैध ठरविण्यात येणार आहेत. तसेच, ही मते आपचे उमेदवार कुलदीप कुमार यांच्या बाजूने असल्याचे सांगितले. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या या निर्णयामुळे भाजपाला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. (Important decision of the Supreme Court regarding the Chandigarh Mayor Poll election)
हेही वाचा… Maratha Reservation : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष म्हणतात, आमच्या आरक्षणाला…
31 जानेवारीला चंदीगडमध्ये महापौर पदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत बहुमत नसतानाही चंदीगडच्या महापौर निवडणुकीत भाजपाच्या बाजूने निकाल दिला. ज्यानंतर विरोधकांनी म्हणजेच काँग्रेस आणि आपच्या नगरसेवकांनी या निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भाजपाने गडबड करून ही निवडणूक जिंकल्याचा आरोप काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने केला. ज्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आले. याबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी करण्यात आली आहे.
सुप्रीम कोर्टाने आपच्या गोटातील अवैध ठरविण्यात 8 मते वैध ठरवली आहेत. त्यामुळे आता पुन्हा मतमोजणी घेण्यात येणार आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने भाजपा आणि आम आदमी पक्ष यांच्यातील 8 मते अवैध ठवल्याच्या वादावर सुनावणी घेतली. यानंतर या मतांची पुन्हा मोजणी केली जाईल, असे न्यायालयाने सांगितले. या आधारेच निकाल जाहीर केला जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या या निर्णयामुळे चंदीगडमध्ये आम आदमी पक्षाचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत या मतांची पुनर्मोजणी झाल्यानंतर महापौरपदाच्या शर्यतीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेस आघाडीला स्पष्ट विजय मिळणार आहे. ही सर्व मते कोणतेही ठोस कारण न देता फेटाळण्यात आली होती.
सुप्रीम कोर्टात आज (ता. 20 फेब्रुवारी) या प्रकरणी सरन्यायाधीशांनी वकील आणि निरीक्षकांना मतपत्रिका दाखवल्या आणि अवैध ठरविण्यात आलेल्या 8 मतपत्रिकांपैकी सर्व मतपत्रिकांवर कुलदीप कुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे सांगितले. अनिल मसीह यांनी या मतपत्रिकेवर एक रेष ओढली होती, असे न्यायालयाने नमूद केले आहे. कोणताही गैरप्रकार नसताना आपण त्यांना बेकायदेशीर ठरवणारी रेषा का ओढली, असा प्रश्नही सुप्रीम कोर्टाने उपस्थित केला. यावर अनिल मसीह यांच्या वकिलांनी मतदानादरम्यान वातावरण खराब झाल्याचे सांगितले. त्यामुळे कदाचित हे लोक मतपत्रिकेत गडबड करून त्या घेऊन पळून जात असावेत, असे अनिल मसीह यांना वाटले असे सांगण्यात आले. त्यामुळे अनिल मसीह याने मतपत्रिका हिसकावून त्यावर क्रॉस मार्क करून त्या अवैध ठरवल्या. मात्र, त्यांच्या युक्तिवादावर सर्वोच्च न्यायालयाचे समाधान झाले नाही.