जयपूर : राजस्थानमध्ये येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. परंतु निवडणुकांच्या माध्यमातून राजकारणामध्ये गुन्हेगार प्रवृत्तीच्या उमेदवरांचा वाढता प्रवेश लक्षात घेता निवडणूक आयोगाकडून ठोस पाऊल उचलण्यात आले आहे. जो कोणता राजकीय पक्ष गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला उमेदवारी देईल, त्या पक्षाला त्या व्यक्तीबाबतची माहिती आणि त्या व्यक्तीला उमेदवारी का दिली? याबाबतची वृत्तपत्रातून द्यावी लागेल तसेच, निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनाही वर्तमानपत्रात जाहिराती देऊन त्यांच्यावर कोणते गुन्हे आहेत? याबाबतची माहिती द्यावी लागणार आहे. त्यामुळे उमेदवारांच्या वैयक्तिक माहिती संदर्भात निवडणूक आयोगाने उचललेल्या या पावलामुळे आता राजकारणात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा वाढता प्रवेश रोखण्यास मदत होणार आहे. (Important step taken by Election Commission to prevent entry of criminals into politics)
हेही वाचा – मुंबई विमानतळावर भरधाव BMW कारची CISF अधिकाऱ्याला धडक; 19 वर्षीय चालकावर गन्हा दाखल
याबाबत जयपूर येथे प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, निवडणूक आयोग मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी कटिबद्ध असून, सर्वसामान्यांना मतदान करणे सोपे जावे आणि मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल. सक्तीच्या मतदानासाठी आयोगापुढे कोणताही प्रस्ताव नाही.
तसेच, राजस्थानमध्ये प्रथमच घरून मतदान करण्याची सुविधा वृद्ध, 40 टक्के अपंग असलेल्यांना देण्यात येईल. यासाठी मतदारांना अधिसूचना जारी झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत फॉर्म भरावा लागेल. यानंतर निवडणूक आयोग त्यांच्या घरूनच मतदान करण्याची व्यवस्था करेल, अशी महत्त्वाची माहिती देखील मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडून देण्यात आली आहे.
याशिवाय प्रसार माध्यमांशी बोलताना निवडणूक आयुक्तांनी आणखी महत्त्वाची माहिती देत सांगितले की, मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आणि मतदान सोपे करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून पुढाकार घेण्यात येत आहे. विशेषतः हरियाणा आणि पंजाब सीमेवर दारू आणि रोख रक्कम याची वाहतूक रोखण्यासाठी कडक सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात यावी, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
उमेदवारांच्या याद्या पितृपक्षामुळे रखडल्या…
येत्या काही महिन्यात अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात येणार आहेत. नोव्हेंबर-डिसेंबर या महिन्यामध्ये पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर होण्यास सुरुवात झाली पाहिजे होती. परंतु पितृपक्षामुळे या याद्या जाहीर होण्यापासून रखडल्या आहेत. 14 ऑक्टोबरपर्यंत पितृपक्ष असून, हा काळ अशुभ मानला जातो. त्यामुळे पितृपक्ष संपेपर्यंत या याद्या जाहीर होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.