इम्रान खान यांच्या आंदोलनाला खीळ, पाकिस्तानच्या पंजाबमध्ये कलम 144 लागू

Imran Khan

इस्लामाबाद : दहशतवादी कारवायांची शक्यता असल्याचे सांगत पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या सरकारने लाहोरमध्ये सात दिवसांसाठी कलम 144 लागू केले आहे. इम्रान खानच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षातर्फे (पीटीआय) निषेध रॅलींचे आयोजन केले आहे, या पार्श्वभूमीवर तेथील काळजीवाहू सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, लाहोरमधील तीन भागांत पुढील सात दिवसांसाठी कलम 144 लागू करण्यात आले आहे.

कलम 144 लागू केल्याने आता सर्व प्रकारच्या चौकसभा, जाहीरसभा आणि मेळावे घेण्यास मनाई आहे. लाहोरच्या पोलीस उपआयुक्तांनी काळजीवाहू पंजाब सरकारला 144 कलम लागू करण्यासाठी पत्र लिहिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे एआरवाय न्यूजने म्हटले आहे. विशेष म्हणजे, पीटीआय प्रमुख इम्रान खान यांनी टेलिव्हिजनवरून लोकांना संबोधित करताना जेल भरो आंदोलनाची हाक दिली होती. 22 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत पीटीआयचे 200 कार्यकर्ते आणि नॅशनल असेंब्लीचे सहा सदस्य दररोज अटक करवून घेणार आहेत. कार्यकर्त्यांना व नॅशनल असेंब्लीच्या सदस्यांना अटक न झाल्यास ते ठिय्या आंदोलन करणार आहेत. पीटीआयचे कार्यकर्ते 22 फेब्रुवारीला जेल भरो आंदोलन करणार असून, पेशावरचे कार्यकर्ते 23 फेब्रुवारीला पेशावर येथे, 24 फेब्रुवारीला रावळपिंडीला, 2 फेब्रुवारीला मुलतान आणि गुजरांवाला येथील कार्यकर्ते तुरुंग जेलभरो आंदोलन करणार आहेत.

आम्ही सर्व तुरुंग भरून टाकू आणि शाहबाझ शरीफ सरकारच्या अधिकाऱ्यांना लपायला देखील जागा मिळणार नाही, असे सांगत इम्रान खान यांनी, आपल्या पक्षाच्या नेत्यांना तसेच मित्रपक्षांना विद्यमान आघाडी सरकारकडून लक्ष्य केले जात असल्याचा आरोप केला. मुलतानमधील पीटीआय कार्यकर्त्यांच्या घरात घुसून पोलीस धमकावत असल्याचा दावाही त्यांनी केला.

पीटीआयचा दबाव शरीफ सरकारने झुगारला
पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने पंजाब आणि खैबर पख्तूनख्वा प्रांतात एप्रिलमध्ये विधानसभा निवडणुका घेण्याचा प्रस्ताव दिला आहे. या प्रांतांमध्ये इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाची सत्ता होती. परंतु पीटीआयने देशात तत्काळ सार्वत्रिक निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी प्रांतीय विधानसभा विसर्जित केल्या. मात्र, पाकिस्तान सरकार या दबावापुढे झुकले नाही. पाकिस्तान निवडणूक आयोगाने पंजाब आणि खैबर पख्तूनख्वामध्ये 9 एप्रिल 2023 रोजी विधानसभा निवडणुका जाहीर केल्या आहेत.