मध्य प्रदेशात कारम नदीवर बांधले जात असलेले धरण फुटण्याच्या मार्गावर, गावांचं स्थलांतरण

मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात कारम नदीवर मध्यम पाटबंधारे प्रकल्पांतर्गत बांधण्यात येत असलेल्या धरणातील गळतीनंतर पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. धरणातील उजव्या बाजूच्या मध्यभागी डाऊन स्ट्रीमची माती घसरल्याने धरण धोक्यात आल्याचे सांगितले जात आहे. अशी परिस्थिती आज सकाळच्या दरम्यान निर्माण झाली आहे. मातीपासून बनवण्यात आलेल्या भिंतीचा मोठा भाग कोसळला आहे. या धरणाची लांबी 590 मीटर आणि उंची 52 मीटर असून सध्या धरणात 15 एमसीएम पाणीसाठा आहे.

पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे खबरदारी म्हणून धार जिल्ह्यातील 12 गावे आणि खरगोन जिल्ह्यातील 6 गावे रिकामी करून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. एनडीआरएफ टीम, एसडीआरएफ आणि इंदूर टीम घटनास्थळी बचाव कार्यासाठी सज्ज आहे. एवढेच नाही तर हवाई दलाची 2 हेलिकॉप्टर आणि आर्मीची एक कंपनी स्टँडबाय ठेवण्यात आली आहे.

धार धरण सुरक्षित ठेवण्यासाठी जलसंपदा विभागाकडून काम केले जात आहे. दुसरीकडे, इंदूर आणि भोपाळ येथील तज्ज्ञांचे पथक धरणाची पाहणी करण्यासाठी पोहोचले आहे. पाण्याचा निचरा करण्यासाठी धरणाचे दरवाजे उघडण्याची तयारी सुरू आहे. तसेच दुरुस्तीचे काम जोरात सुरू आहे.

कारम धरणाच्या ठिकाणी लष्कराचे 200 जवान रवाना झाले आहेत. एनडीआरएफच्या डीजींनी एसीएस होमला कळवले आहे की, एनडीआरएफच्या 3 अतिरिक्त टीम्स दिल्लीहून धामनोदला बचाव सामग्रीसह रवाना केल्या जात आहेत. प्रत्येक NDRFटीममध्ये 30-35 प्रशिक्षित बचाव कर्मचारी असतात. एसडीईआरएफच्या 8 अतिरिक्त टीम राज्याच्या इतर जिल्ह्यांमधून आणि भोपाळ येथून डीजी एचजी रिझर्व्हमधून पाठवण्यात आल्या आहेत. हवाई दलाची 2 हेलिकॉप्टर सध्या स्टँडबायवर ठेवण्यात आली आहेत. इंदूर विभाग आणि धार जिल्ह्यातील सर्व संबंधित उच्च अधिकारी रात्री धामनोद आणि धरणाच्या ठिकाणी राहतील आणि बचाव कार्यावर सतत लक्ष ठेवतील.


हेही वाचा : संजय राऊतांचं तुरुंगातही वाचन-लिखाण सुरूच, वाचा दिनक्रम!