नवी दिल्ली – प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यात पवित्र स्नानासाठी देश-विदेशातून भाविक येत आहेत. मात्र काही महाभाग यातही आपल्या विकृत मनोवृत्तीचे दर्शन घडवत आहेत. महाकुंभमेळ्यात महिलांचे स्नान करतानाचे व्हिडिओ बनवून ते डार्क वेबवर विकल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी सांगली जिल्ह्यातून एकाला अटक करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशात महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. महाकुंभात भक्तीभावाने स्नान करण्यासाठी कोट्यवधी लोक येत आहेत. महाकुंभात स्नान करण्यासाठी आलेल्या महिलांचे व्हिडिओ तयार करुन काही तरुणांनी ते सोशल मीडियावर शेअर केले. एवढंच नाही तर स्नान करतानाचे महिलांचे व्हिडिओ विक्रीचाही प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील एकाला अटक करण्यात आली आहे. प्राज पाटील असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. गुजरात पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
सांगलीच्या प्राज पाटीलसह लातुरमधील प्रणव तेली आणि प्रयागराज येथील चंद्रप्रकाश फुलचंद या दोघा बदमाशांनाही अटक करण्यात आले आहे. गुजरात पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. गुजरात पोलिसांच्या तपासात समोर आले की लातूर येथील प्रणव तेली हा आरोपी अंतरराष्ट्रीय हॅकर्सच्या संपर्कात होता.
प्रणव हा प्रयागराज मध्ये मिळेल त्या जागेवर व्हिडिओ तयार करत होता, यासाठी रोमानिया आणि अटलांटा येथील हॅकर्सच्या मदतीने तो व्हिडिओ तयार करत होता आणि ते डार्क वेबवर पाठवायचा. लातूरच्या प्रणव तेलीसोबत सांगलीच्या प्राज पाटील याचीही भूमिका महत्त्वाची असल्याचे तपासात समोर आले.
स्नान करणाऱ्या महिलांचे व्हिडिओ विक्री करायचे
लातूर आणि सांगलीतील तरुण आणि इतरही आरोपी हे टेलिग्रामवर वेगवेगळे अकाऊंट तयार करुन तिथे व्हिडिओ पब्लिश करत होते. टेलिग्राम अकाऊंटचे सदस्यत्व दोन ते चार हजार रुपये घेऊन दिले जात होते. तिथे व्हिडिओ पब्लिश करुन पैसे कमवत असल्याचे तपासात समोर आले आहे. प्रयागराज येथील कुंभमेळ्यात महिलांचे अर्धनग्न अवस्थेतील व्हिडिओ परदेशी हॅकर्सने बनवले आणि डार्क वेबवर पोस्ट केले आहे.
लातूरच्या तेलीच्या खात्यात परदेशातून पैसे जमा
आरोपींनी कुंभमेळ्यातील स्नान करणाऱ्या महिलांसह महाराष्ट्र आणि गुजरातमधील हॉस्पिटल आणि मॉल्समध्येही महिलांचे व्हिडिओ बनवून ते डार्क वेबवर पोस्ट केले. लातूरमधून ही महिलांच्या नकळत त्यांचे अर्धनग्न व्हिडिओ तयार करुन पोस्ट करुन पैसे कमावण्याची लिंक सापडली आहे. लातूरमधील तेलीच्या खात्यात परदेशातून पैसे आल्याची माहिती गुजरात पोलिसांना मिळाली. त्यानंतर गुजरात पोलिस आणि प्रयागराज येथे दोन एफआयआर नोंदवले गेले.