घरदेश-विदेशदेशात हिंसाचाराच्या घटना सुरूच, बिहारमधील सासाराम आणि नालंदामध्ये दगडफेक आणि जाळपोळ

देशात हिंसाचाराच्या घटना सुरूच, बिहारमधील सासाराम आणि नालंदामध्ये दगडफेक आणि जाळपोळ

Subscribe

बिहारमधील सासाराम जिल्ह्यात आज शुक्रवारी (ता. ३१ मार्च) हिंसाचार उसळला. यावेळी दोन गटांनी एकमेकांवर दगडफेक केल्याने या ठिकाणची परिस्थिती आणखी चिघळली. या घटनेनंतर प्रशासनाने अनेक हिंसाचार घडलेल्या भागात कलम 144 लागू केले आहे. त्यानंतर नालंदा जिल्ह्यात देखील हिंसाचाराची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

बिहारमधील सासाराम जिल्ह्यात रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी आज शुक्रवारी (ता. ३१ मार्च) हिंसाचार उसळला. यावेळी दोन गटांनी एकमेकांवर दगडफेक केली आणि याचवेळी काही लोकांकडून गोळीबार देखील करण्यात आला. या गोळीबारामध्ये दोन पोलिसांना गोळी लागल्याची माहिती समोर आली आहे. परंतु, या वृत्ताला पोलीस प्रशासनाकडून दुजोरा देण्यात आलेला नाही. तसेच, हिंसाचारग्रस्त भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अनेक भागात कलम 144 लागू करण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सासाराम जिल्ह्यात दोन गटात झालेल्या वादानंतर या ठिकाणी दगडफेक आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर, झोपडीसदृश दुकानाला आग लागल्याने या हिंसाचार घडलेल्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर जिल्ह्यातील कादिरगंज, मुबारकगंज, चौखंडी, नवरत्न बाजार येथे दुकाने बंद ठेवण्यात आलेली आहेत.

- Advertisement -

दरम्यान, या घटनेच्या काही वेळातच रोहतासचे डीएम धर्मेंद्र कुमार आणि एसपी विनीत कुमार हे पोलीस दलासह घटनास्थळी पोहोचले. तसेच त्यांच्याकडून परिस्थितीचा आढावा देखील घेण्यात आला. परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर या हिंसाचाराच्या घटनेनंतर गोळाबाजारकडे जाणाऱ्या रस्त्यावर दगड-विटांचा खच पडलेला आहे. त्याचबरोबर अनेक दुचाकींचीही तोडफोड करण्यात आली आहे.

रविवारी अमित शाह यांचा दौरा
सासारामच्या परिसरात जिथे हिंसाचार झाला आहे, त्या ठिकाणापासून दोन किलोमीटर अंतरावर रविवारी एक कार्यक्रम होणार आहे. ज्यामध्ये देशाचे गृहमंत्री अमित शाह सहभागी होणार आहेत. सम्राट अशोक जयंती उत्सवाबाबत भाजपकडून परिसरात पोस्टरही लावण्यात आले आहेत.

- Advertisement -

नालंदा येथील हिंसाचारात ७ जण जखमी
देशात घडणाऱ्या हिंसाचारांच्या घटनात थांबत नसून बिहार राज्यातील नालंदा जिल्ह्यात देखील रामनवमीच्या शोभायात्रेवर दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे. याआधी दुपारी जिल्ह्यातील सासाराममध्ये देखील अशीच हिंसाचाराची घटना घडली होती. रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी आज (ता. ३१ मार्च) नालंदा जिल्ह्यातील गगन दिवान मोहल्ला या लहेरी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या भागात ही शोभायात्रा काढण्यात आली होती.

बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्यावतीने काढण्यात आलेल्या रामनवमीच्या शोभायात्रेवर समाजकंटकांकडून दगडफेक करण्यात आली. तर यानंतर करण्यात आलेल्या गोळीबारात सात जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर नालंदा जिल्ह्याला छावणीचे रूप आले आहे. तर अनेक भागांत कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

देशात हिंसाचाराच्या घटना सुरूच
गेल्या दोन दिवसांपासून देशात हिंसाचाराच्या घटना या सुरूच आहेत. राम नवमीच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजीनगर येथे दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर काल गुरूवारी (ता. 30 मार्च) गुजरात राज्यातील वडोदरा जिल्ह्यात फतेपुरा येथे राम नवमीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेवर समाजकंटकांकडून दगडफेक करण्यात आली. त्यानंतर कोलकता येथील हावडा येथे आणि मुंबईतील मालाडमध्ये असलेल्या मालवणी परिसरात राम नवमीच्या शोभायात्रामध्ये तणाव निर्माण झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे देशात घडणाऱ्या या हिंसाचारांच्या घटनांचा नेमका मास्टर माईंड कोण? हे शोधण्याचे मोठे आव्हान केंद्रातील गृहखात्याकडे आहे.


हेही वाचा – शिर्डीत भाविक-सुरक्षा रक्षकांत हाणामारी, व्हिडीओ व्हायरल; नेमकं काय घडलं?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -