IT पोर्टलवर दिवसापोटी ३ लाख रिटर्न फाईल, वेबसाईटच्या अडचणी लवकरचं होणार दूर

income tax portal infosys says income tax portal stabilising close to 1 crore 90 lakhs returns filed
IT पोर्टलवर दिवसापोटी ३ लाख रिटर्न फाईल, वेबसाईटच्या अडचणी लवकरचं होणार दूर

आयकर रिटर्न दाखल करताना (Income Tax return) नव्या पोर्टलवर करदात्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. यामुळे वेबसाईट तयार करणारे इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सलिल पारेख यांना मोठ्याप्रमाणात टीकेचा सामना करावा लागला. यानंतर सलिल पारेख यांनी बुधवारी कंपनीद्वारे विकसित नव्या पोर्टलवर सुधारणा होत असून आत्तापर्यंत १.९ कोटी रिटर्न फाईल करण्यात आल्याचे सांगत करदात्यांच्या अडचणी लवकरचं दूर होतील असे आश्वासन दिले आहे. पारेख यांनी सांगितले की, आत्तापर्यंत ३.८ कोटी वापरकर्त्यांनी विभिन्न देवाण-घेवाण पूर्ण केली आहे. यात दरदिवसा २ ते ३ लाख आयटी रिटर्न फाईल होत आहेत.

दुसऱ्या तिमाहीसाठी कंपनीचे निकाल जाहीर केल्यानंतर पारेख यांनी पत्रकारांना सांगितले की, “आम्ही Income Tax  वेबसाईटमध्ये सतत सुधारणा करत आहोत. आत्तापर्यंत नव्या पोर्टलच्या माध्यमातून १.९ कोटींपेक्षा जास्त रिटर्न फाईल करण्यात आला आहे. आज आयकर रिटर्न फॉर्म १ ते ७ सर्व काम करत आहे. बहुतेक सर्व वैधानिक फॉर्म सिस्टमवर उपलब्ध आहेत. मात्र या वेबसाईटवरील तांत्रिक अडचणी केव्हापर्यंत दूर होतील हे अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही. तसेच सर्व सुविधा रिटर्न फाइल करण्यांसाठी केव्हा उपलब्ध होतील हे देखील स्पष्ट नाही.

इन्फोसिसचा चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबरमध्ये संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफा ११.९ टक्क्यांनी वाढून ५४२१ कोटी (१२.८८ रुपये प्रति शेअर) झाला आहे. जागतिक स्तरावर जास्त करारामुळे कंपनीने चालू आर्थिक वर्षासाठी महसूल अंदाज वाढवला आहे. यामुळे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीला ४८४५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. कंपनीने म्हटले आहे की, पुनरावलोकनाच्या तिमाहीत निव्वळ नफा जून तिमाहीपेक्षा ४.४ टक्के जास्त आहे.

कंपनीने म्हटले आहे की, तिमाहीत त्यांचा महसूल २०.५ टक्क्यांनी वाढून २९,६०२ कोटी रुपये झाला आहे, जो एक वर्ष आधीच्या तिमाहीत २४.५७० कोटी रुपये होता. बेंगळुरू स्थित कंपनीने चालू आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी महसूल वाढीचा अंदाज १६.५-१७.५ टक्के केला आहे. यापूर्वी, कंपनीने आपल्या उत्पन्नात १४-१६ टक्के वाढीचा अंदाज वर्तवला होता.