घर देश-विदेश INDIA alliance : सर्व धागे जुळून एक अतूट वस्त्र निर्माण होत आहे,...

INDIA alliance : सर्व धागे जुळून एक अतूट वस्त्र निर्माण होत आहे, मात्र…, ठाकरे गटाचा इशारा

Subscribe

मुंबई : मुंबईमध्ये गुरुवारी (31 ऑगस्ट) आणि शुक्रवारी (1 सप्टेंबर) विरोधकांची आघाडी असलेल्या ‘इंडिया’ची (INDIA) बैठक झाली. पश्चिम बंगालात ममता बॅनर्जी, काँग्रेस व डाव्यांत मतभेद आहेत, पण ते चर्चा करण्यासाठी या बैठकीनिमित्त टेबलावर एकत्र आले. केरळातही तेच. दिल्ली, पंजाबात ‘आप’ने काँग्रेसशी चर्चा करण्याची तयारी दाखवली. महाराष्ट्रात कोणतेही विशेष मतभेद नाहीत. जम्मू-कश्मीरात डॉ. फारुख अब्दुल्ला व मेहबुबा मुफ्ती एकत्र आहेत. असे सर्व धागे जुळून एक अतूट वस्त्र निर्माण होत आहे, मात्र देशाला कार्यक्रम दिला नाही तर, हे वस्त्र निरर्थक ठरेल, असा इशारा ठाकरे गटाने दिला आहे.

हेही वाचा – INDIA alliance : मोदी काय साध्य करीत आहेत? ठाकरे गटाचा हल्लाबोल

- Advertisement -

देशातील प्रश्नांवर रान उठवावे लागेल, जागावाटपाचा तिढा राज्याराज्यांत शांतपणे सोडवावा लागेल. एक राष्ट्रीय कार्यक्रम ठरवून जनतेसमोर जावे लागेल. आता बैठका नकोत, तर लोक आंदोलनाच्या जाहीर सभा राज्याराज्यांत घ्यायला हव्यात. हुकूमशाहीला थेट भिडायचे व 28 पक्षांच्या इंडिया आघाडीत मुक्त संवाद ठेवायचा हे सूत्र आता ठरले आहे ते महत्त्वाचे असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दैनिक सामनातील अग्रलेखात म्हटले आहे.

हुकूमशहा माथेफिरूच असतो

देशात भ्रष्टाचाराचा डोंगर उभा आहे. या डोंगराच्या पायथ्याशी मोदींचे सरकार व शिखरावर मोदींचे मित्रमंडळ आहे. केंद्राच्या ‘कॅग’ अहवालात ते स्पष्ट झाले. हुकूमशहा हा माथेफिरूच असतो. त्याने घेतलेल्या निर्णयांत सुसंगती नसते. सिंहासन हलवले जात आहे, या भयाने तो अधिक बेफामपणे वागतो व निर्णय घेतो. भारत देशात आता तशा बेफामपणाचा अनुभव येऊ लागला आहे. हुकूमशहा देशाचे आराध्य दैवत श्री गणेशालाही मानायला तयार नाही. श्री गणेशाच्या कृपेने शुभारंभ होत असताना त्यांनी श्री गणेशाच्या आगमनप्रसंगीच हुकूमशाहीचे शिंग फुंकले, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – INDIA alliance : राजा घाबरला आणि…, ठाकरे गटाचा पंतप्रधान मोदीवर घणाघात

सर्वच योद्धे मैदानात उतरले

‘इंडिया’ आघाडीचे युद्ध त्या हुकूमशाही प्रवृत्तीविरुद्ध आहे. सर्वच योद्धे मैदानात उतरले आहेत. ही लढाई देश वाचविण्यासाठी आहे. मुंबईनेच ब्रिटिशांना ‘चले जाव’, ‘भारत छोडो’चा आदेश दिला होता. त्याच मुंबईतून ‘हुकूमशाही चले जाव’चा आदेश ‘इंडिया’ आघाडीने दिला आहे. ‘इंडिया’ जिंकेल, भारत अखंड राहील. लोकशाही विजयी होईल! स्वातंत्र्यवीरांचे पुण्य अद्यापि संपलेले नाही, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

- Advertisment -