नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांच्या चर्चेचा विषय ठरलेली G-20 परिषद ही राजधानी दिल्लीमध्ये पार पडली. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना स्नेहभोजनाचे आमंत्रण दिले होते. महत्त्वाची बाब मुख्यमंत्र्यांसह देशातील काही महत्त्वाच्या व्यक्तींना देखील याचे निमंत्रण देण्यात आले होते. परंतु या स्नेहभोजनाला INDIA आघाडीतील काही प्रमुख नेत्यांनी हजेरी लावल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या डिनरच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर त्यांच्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी टीका केली. परंतु आता बिहारचे मुख्यमंत्री आणि विरोधकांच्या INDIA आघाडीतील प्रमुख नेते असलेले नितीश कुमार यांनी सुद्धा या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा केल्या जात आहेत. (INDIA alliance Leader Nitish Kumar Attends G-20 Lunch)
हेही वाचा – India Alliance : जी20च्या स्नेहभोजनाला ममता बॅनर्जी यांची उपस्थिती, काँग्रेसची नाराजी
काहीच दिवसांपूर्वी मुंबईमध्ये इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये नितीश कुमार देखील हजर होते. तर महत्त्वाची बाब म्हणजे विरोधकांची भाजपविरोधात मोट बांधण्याचे प्रमुख काम देखील नितीश कुमार यांनीच केले. तर इंडिया आघाडीची जी पहिली बैठक पार पडली ती सुद्धा नितीश कुमारांच्या पाटण्यात पार पडली. ज्यामुळे त्यांनी राष्ट्रपतींच्या स्नेहभोजनाला हजेरी लावल्याने सर्वांकडून याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
नितीश कुमार हे याआधी भाजपच्या सहकारी पक्षांपैकी एक होते. परंतु त्यांनी अचानकपणे भाजपकडून दिल्लीमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या मित्रपक्षांच्या बैठकांमध्ये गैरहजर राहण्यास सुरुवात केली. त्यानंतर नीती आयोगाच्या बैठका आणि पंतप्रधानांनी बोलावलेल्या बैठकांपासूनही त्यांनी दूर राहण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी जुलैमध्ये ते माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या पंतप्रधानांकडून आयोजित करण्यात आलेल्या निरोपाच्या भोजनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. नितीश कुमार यांनी त्यानंतर विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी समारंभातही सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आणि अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या पुढच्या वाटचालीचा इशारा देत मागील वर्षी ऑगस्टमध्ये भाजपशी संबंध तोडून महाआघाडीत प्रवेश केला होता.
इंडिया आघाडीमध्ये भाजपच्या विरोधात एकूण 26 पक्ष एकत्र आले आहेत. या आघाडीतील प्रमुख नेते म्हणून नितीश कुमार यांच्याकडे पाहिले जाते. त्याशिवाय इंडिया आघाडीच्या सल्लागार पदी देखील नितीश कुमार यांच्याच नावाची चर्चा करण्यात येते. त्यामुळे त्यांनीच आता या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने ते इंडिया आघाडीत नाराज असल्याच्या चर्चांना आता उधाण आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे नितीश कुमार यांची यावेळी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही राष्ट्रांच्या प्रमुखाशी ओळख करून दिली, तर यावेळी नितीश कुमार हे मोदींशी हसत बोलताना दिसून आले.