मुंबई : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) आव्हान देण्यासाठी प्रमुख विरोधी पक्ष एकत्र आले असून त्यांनी ‘इंडिया’ (INDIA) आघाडी तयार केली आहे. याचपार्श्वभूमीवर मुंबईत ‘इंडिया’ आघाडीची तिसरी बैठक सुरू आहे. या बैठकीत आघाडीच्या लोगोचे अनावरण होणार असल्याचे आधी जाहीर करण्यात आले होते. परंतु, आता त्याबाबत अनिश्चितता आहे, असे खुद्द ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – INDIA Alliance : लोगो नंतर, आधी समन्वयक, संयोजक पदावर होणार चर्चा; वडेट्टीवारांनी केलं स्पष्ट
‘इंडिया’ आघाडीचा लोगो भारतीय जनतेसाठी खूप प्रेरणादायी आहे. त्याचे अनावरण 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता होणार आहे. आमच्यावर हल्ला करणाऱ्या आणि जखमा देणाऱ्या विरोधकांना महागात पडेल, हीच प्रेरणा आमचा लोगो देणार आहे, असे खासदार संजय राऊत यांनी दोनच दिवसांपूर्वी म्हटले होते. मात्र, काल, गुरुवारी या लोगोचे अनावरण न झाल्याने ते आज, शुक्रवारी होणार असल्याचे सांगितले जात होते. परंतु आता या बैठकीत लोगोचे अनावरण केले जाणार नाही, अशी माहिती राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. आधी समन्वयक, संयोजकपदावर चर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितले.
याच अनुषंगाने खासदार संजय राऊत यांच्याकडे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारणा केली असता, ते म्हणाले, काही पक्षांना या लोगोबाबत चर्चा करण्यासाठी वेळ हवा आहे. त्यामुळे त्यावर आज चर्चा होईल. त्यानंतर आज-उद्या किंवा दोन दिवसांत राजधानी दिल्लीत सुद्धा या लोगोचे अनावरण होऊ शकते. मात्र, आघाडीचा लोगो रद्द झालेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – INDIA आघाडीच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष, समन्वयक पदाबाबत होणार निर्णय
आजच्या बैठकीत काय ठरणार?
मुंबईतील ग्रॅण्ड हयातमध्ये ‘इंडिया’ची बैठक सुरू आहे. काल, गुरुवारी येथे विविध विषयांवर अनौपचारिक चर्चा झाल्या. मात्र आज, महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहेत. या आघाडीत 28 पक्षांचा समावशे आहे. प्रत्येक पक्षाला सामावून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे संजय राऊत म्हणाले.
विविध समित्यांबाबत आज चर्चा होणार असून, त्यात मुख्य समन्वय समिती असेल. त्याशिवाय, रिसर्च समिती, प्रचार समिती, कार्यकारी गट असे विविध बाबींवर चर्चा आणि निर्णय होणार असून त्यात प्रत्येक पक्षाला सामावून घेऊ, अशी माहिती त्यांनी दिली.