मुंबई : मुंबईमध्ये गुरुवारी (31 ऑगस्ट) आणि शुक्रवारी (1 सप्टेंबर) विरोधकांची आघाडी असलेल्या ‘इंडिया’ची (INDIA) बैठक झाली. इंडिया गटाच्या बैठकीने देशात कोणता संदेश गेला? तर एकच संदेश तो म्हणजे, ‘राजा घाबरला आणि सिंहासन टिकविण्यासाठी तो कोणत्याही थराला जाईल.’ विरोधक देशात अराजक माजवू इच्छित आहेत या सबबीखाली इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. आता आपल्या राजकीय विरोधकांना घाबरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणती लोकशाहीविरोधी पावले उचलतात ते पाहू, असा घणाघात ठाकरे गटाने केला आहे.
हेही वाचा – INDIA alliance : मोदी काय साध्य करीत आहेत? ठाकरे गटाचा हल्लाबोल
चार गाढव एकत्र चरत असले तरी हुकूमशहाला दरदरून घाम फुटतो. त्याला वाटते की, ते आपल्याविरुद्ध कारस्थाने करून सत्ता उलथवीत आहेत. इकडे मुंबईत तर देशाच्या राजकारणातील 28 प्रमुख राजकीय पक्ष आणि त्यांचे दिग्गज नेते दोन दिवस एकत्र जमले व त्यांनी देशातील हुकूमशाही राजवट उलथवून टाकण्याचा एल्गार केला. त्यामुळे मोदी सरकारला ‘इंडिया’ची धास्ती वाटणारच, अशी बोचरी टीका सामनातील अग्रलेखातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात एक वर्ग असा होता की, त्यांना ‘ब्रिटिशांचे राज्य हे ईश्वरी वरदान आहे. या देशातील बजबजपुरी नष्ट होऊन येथे कायद्याचे, सामाजिक सुधारणेचे राज्य निर्माण होईल. स्वातंत्र्य काय नंतरही मिळवता येईल,’ असे वाटायचे. स्वातंत्र्य आधी की सामाजिक सुधारणा? असा वादही तेव्हा आपल्या पुढाऱ्यांत झाला होता. मोदी काळात तर स्वातंत्र्य उरलेले नाहीच, परंतु सामाजिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक क्षेत्रातही आपली पीछेहाट होताना दिसत आहे, असे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा – महाराष्ट्र आणि भारतातील लोकशाहीवर प्रश्नचिन्ह, जालना लाठीचार्जवरून आदित्य ठाकरेंची टीका
‘इंडिया’ आघाडीचे युद्ध हुकूमशाही प्रवृत्तीविरुद्ध आहे. सर्वच योद्धे मैदानात उतरले आहेत. ही लढाई देश वाचविण्यासाठी आहे. मुंबईनेच ब्रिटिशांना ‘चले जाव’, ‘भारत छोडो’चा आदेश दिला होता. त्याच मुंबईतून ‘हुकूमशाही चले जाव’चा आदेश ‘इंडिया’ आघाडीने दिला आहे. ‘इंडिया’ जिंकेल, भारत अखंड राहील. लोकशाही विजयी होईल! स्वातंत्र्यवीरांचे पुण्य अद्यापि संपलेले नाही, असा आशावादही ठाकरे गटाने व्यक्त केला आहे.