(India – Bangladesh) कोलकाता : हिंदूंवरील अत्याचारावरून भारत आणि बांगलादेश यांच्यात तणाव वाढत असला तरी, दुसरीकडे दक्षिण बंगाल फ्रंटियर भागात तैनात सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) माणुसकीचे एक उत्तम उदाहरण सादर केले आहे. बीएसएफने गुरुवारी एका बांगलादेशी महिलेला तिच्या मृत भारतीय भावाच्या अंत्यदर्शन घडविले मदत केली. भावाला शेवटचे पाहण्याची इच्छा या महिलेने व्यक्त केली होती. (Bangladeshi woman gets last glimpse of deceased Indian brother)
गांगुली गावचे रहिवासी अब्दुल खालिद मंडल यांचे निधन झाल्याची माहिती पंचायत सदस्याने मुस्तफापूर सीमा चौकीच्या कंपनी कमांडरला दिली. मंडलची बहीण बांगलादेशातील सरदार बारीपोटा गावात राहते आणि तिला आपल्या भावाचे अंतिम दर्शन घ्यायचे होते. कंपनी कमांडरने याचे गांभीर्य ओळखून त्वरित बॉर्डर गार्ड्स बांगलादेशशी (BGB) संपर्क साधला. यानंतर झीरो लाइन (आंतरराष्ट्रीय सीमा) येथे दर्शनाची व्यवस्था केली. त्यानुसार मुस्तफापूर सीमा चौकीजवळील झीरो लाइनजवळ येथे अब्दुल खालिद मंडल यांची बहीण तसेच त्यांच्या कुटुंबातील इतरांनी अंतिम दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. या मानवतावादी उपक्रमाबद्दल कुटुंबाने दोन्ही देशांच्या सीमा सुरक्षा दलांचे आभार मानल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.
हेही वाचा – Sanjay Raut About Fadnavis : फडणवीस यांचे कौतुक थांबेना, काय म्हणाले संजय राऊत?
बीएसएफचे जवान रात्रंदिवस सीमेवर पहारा देतातच, त्याचबरोबर सीमावर्ती भागातील लोकांच्या मानवतावादी आणि सामाजिक गरजांबाबतही मदत करण्यास तत्पर असतात, असे एन के पांडे, जनसंपर्क अधिकारी, उपमहानिरीक्षक (डीआयजी), दक्षिण बंगाल फ्रंटियर यांनी सांगितले.
हिंदूंविरोधात सुरू असलेल्या हिंसाचारावरून भारत आणि बांगलादेश यांच्यातील तणाव गेल्या काही महिन्यांत लक्षणीयरित्या वाढला आहे. बांगलादेशातील हिंदू धर्मगुरू चिन्मय कृष्ण दास यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर भारतात त्याचे पडसाद उमटले. याच्या निषेध आंदोलनादरम्यान आगरतळा येथील बांगलादेशी वाणिज्य दूतावासावरही हल्ला करण्यात आला. (India – Bangladesh : Bangladeshi woman gets last glimpse of deceased Indian brother)