पाकिस्तानने मदत मागितल्यास भारत तेथे गहू पुरवू शकतो, आरएसएसची भूमिका

नवी दिल्ली : पाकिस्तानची आर्थिक स्थिती (Pakistan economic crisis) दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. आपल्या शेजारील हा देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला मदत करण्याची भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) मांडली. आमचा ‘सर्वे भवन्तु सुखिनः’ (सर्व सुखी होवो) यावर विश्वास आहे. पाकिस्तानने मदत मागितल्यास भारत तेथे गहू पुरवू शकतो, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने म्हटले आहे.

दिल्लीत चित्रपट निर्माते इक्बाल दुर्रानी यांनी आयोजित केलेल्या सामवेदाच्या पर्शियन अनुवादाशी संबंधित कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह कृष्ण गोपाल यांनी पाकिस्तानासंबंधीची भूमिका मांडली. पाकिस्तानात गहू 250 रुपये किलो या दराने विकला जात आहे, हे ऐकून आम्हाला वाईट वाटते. भारताकडे गव्हाचा अतिरिक्त साठा आहे. भारत 25 ते 50 लाख टन गहू पाकिस्तानला देऊ शकतो, पण तो त्याची मागणी करत नाही, असे कृष्ण गोपाल यांनी सांगितले. अडचणीत असलेल्या पाकिस्तानला भारताप्रती शत्रुत्वाची भूमिका बदलावी लागेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. या कार्यक्रमाला संघाचे नेते इंद्रेश कुमारही उपस्थित होते.

विविध प्रश्नांवर भारताने पाकिस्तानशी चर्चा करावी का, या प्रश्नाला उत्तर देताना गोपाल म्हणाले की, जोपर्यंत पाकिस्तानने आपली वागणूक आणि भूमिका बदलत नाही, तोपर्यंत चर्चा शक्य नाही. पाकिस्तानला दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणे बंद करावे लागेल, असे ते ठामपणे म्हणाले. फाळणीनंतर भारतात राहणाऱ्या मुस्लिमांची भरभराट झाली. त्यांची लोकसंख्या तीन कोटींवरून सुमारे 14.5 कोटी झाली आहे. परंतु पाकिस्तानमधील हिंदूंच्या लोकसंख्येमध्ये मोठी घट झाली आहे, हेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

कोरोना काळात भारताकडून जगाला मदतीचा हात
पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याची योजना अनेकदा आखली आहे. पण तरीही, त्यांनी मनापासून मदत मागितली तर आम्ही ती देऊ, असे सह सरकार्यवाह म्हणाले. महामारीच्या काळात भारताने इतर देशांबद्दल दाखविलेल्या बांधिलकीचा दाखला देत त्यांनी सांगितले की, कोरोना संकटाच्या काळात भारताने जगाला मदत केली.