भारतीय सैन्याची हॅटट्रिक: चीनचा घुसखोरीचा तिसरा प्रयत्नही हाणून पाडला

India - China Crisis

दिवसेंदिवस भारत- चीन सीमेवर तणाव वाढत चालला आहे. एकीकडी सामंजस्याची चर्चा करत असताना दुसरीकडे मात्र चीनच्या कुरापती काही थांबत नाहीयेत. २९-३० ऑगस्टला चीनने घुसखोरी करण्याचा पुन्हा प्रयत्न केला होता. पण भारतीय जवानांनी तो प्रयत्न उधळून लावला. त्यानंतर पुन्हा एकदा सोमवारी चीनकडून घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला. पण भारतीय जवानांनी योग्य प्रत्युत्तर देत त्यांचा डाव उधळला. एएनआयनं याबाबत वृत्त दिलं आहे.

रात्रीच्या अंधाराचा फायदा गेच वेशांतर करून चिनी सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु सतर्क भारतीय जवानांनी चीनच्या सैनिकांना हेरत त्यांचा घुसखोरी करण्याचा डाव उधळून लावला. चीनच्या ७ ते ८ मोठ्या गाड्या चेपुझी कॅम्पवरून भारतीय सीमेच्या दिशेनं येत होत्या. परंतु जवानांनी घेरल्याचं पाहताच त्या गाड्या माघारी परतल्या असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

या आधी गलवान खोऱ्यात भारत आणि चीन जवानांमध्ये चकमक झाली होती. त्यामध्ये भारताच्या २० जवानांना हौतात्म्य आलं होतं. तर भारतांनही प्रत्युत्तर देत चीनच्या अनेक सैनिकांना ठार केलं होतं. त्यानंतरही सीमेवर आपल्या कुरापती सुरूच ठेवल्या आहेत.

२९-३० ऑगस्टच्या रात्री भारत आणि चीन या दोन्ही देशाचे सैनिक आमने-सामने आल्याची माहिती समोर आली होती. यावेळी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चिनी सैन्याला भारतीय सैनिकांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या सैनिकांनी आधी ठरलेल्या एकमताचं उल्लंघन केलं आणि पूर्व लडाखमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला.


हे ही वाचा – Sushant Suicide Case: बॉलिवूडकरांना ड्रग्ज पुरवणाऱ्याला NCB ने घेतलं ताब्यात!