नवी दिल्ली : पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ले केले. भारताने सोमवारी, 6 जानेवारी रोजी याबाबत पाकिस्तानवर टीका केली आहे. आपल्या चुकांचे खापर शेजारच्या देशांवर फोडायचे ही पाकिस्तानची जुनी सवय असल्याचेही भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. (india condemns pakistan airstrikes on afghanistan says old practice to blame neighbours for own failures)
पाकिस्तानने अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यात अनेक महिला आणि मुलांना देखील जीव गमवावा लागला. अशाप्रकारे निष्पाप नागरिकांचा जीव घेणाऱ्या जीवघेण्या हल्ल्यांची आम्ही निंदा करतो, असे भारताने म्हटले आहे.
हेही वाचा – Baba Siddique Murder : मुंबईत दहशत कायम राहावी म्हणून…बाबा सिद्दिकींना मारण्याचे कारण आले समोर…
आपल्या चुका झाकण्यासाठी पाकिस्तान नेहमीच आपल्या शेजारी देशांवर आरोप करत असतो. ही त्याची जुनी सवय असल्याचे भारताने म्हटले आहे. यासंदर्भात आम्ही अफगाणिस्तानच्या प्रवक्त्याचे म्हणणे देखील ऐकल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
पाकिस्तानकडून डिसेंबरमध्ये करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात महिला तसेच मुलांसहित 46 लोक मारले गेल्याचा दावा तालिबानने केला होता. अफगाण सरकारचे उपप्रवक्ता हमदुल्ला फितरत म्हणाले होते की, पक्तिका प्रांतातील बारमल जिल्ह्यातील चार जागांना निशाणा बनवण्यात आले होते. या हल्ल्यात मारल्या गेलेल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर शरणार्थींचा समावेश होता. जे वजीरिस्तानमधील शरणार्थी कँपमधील होते.
Our response to media queries regarding airstrikes on Afghan civilians:https://t.co/59QC0N6mOY pic.twitter.com/UsrkFGJVBZ
— Randhir Jaiswal (@MEAIndia) January 6, 2025
हल्ला झाला तेव्हा तालिबान सरकारने म्हटले होते की, अफगाणिस्तान या हल्ल्याची निंदा करत आहे. हे दुसऱ्या देशावर करण्यात आलेले आक्रमण असून आंतरराष्ट्रीय नियमांच्या विरूद्ध आहे. अशाप्रकारे हल्ले केल्याने प्रश्न सुटणार नाहीत, याचा पाकिस्तानने विचार करायला हवा. आपल्या भूमीचे रक्षण करणे हे अफगाणिस्तानचे प्रमुख ध्येय असून कोणीही अशी आगळीक केल्यात त्यांना ठोस प्रत्युत्तर दिले जाईल, असे अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
हेही वाचा – Mukesh Chandrakar : क्रूरतेचा कळस; ठार मारण्यापूर्वी मुकेश चंद्राकारचे केले हाल; शवविच्छेदन अहवाल काय सांगतो
आपली बाजू मांडताना पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानवर (टीटीपी) आम्ही आम्ही हे हवाई हल्ले केले होते. हा गट पाकिस्तानच्या सुरक्षा दलांवर हल्ला करण्यासाठी अफगाणिस्तानचा आधार घेत असल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे. मात्र, तालिबानने पाकिस्तानचा हा दावा फेटाळला आहे. आणि टीटीपी हा पाकिस्तानचा अंतर्गत मुद्दा असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानने बराच काळ या इस्लामी आंदोलनांना पाठबळ दिले. त्यामुळेच त्यांना आता या प्रश्नांना तोंड द्यावे लागते आहे.