नवी दिल्ली : पश्चिम बंगाल, पंजाब, काश्मीर पाठोपाठ आता उत्तर प्रदेशात देखील विरोधकांची आघाडी असलेल्या इंडियाला खिंडार पडण्याची शक्यता आहे. जागावाटपाबाबत समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात एकमत न झाल्याने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत सपाचे प्रमुख अखिलेश यादव सहभागी होणार नाही. याशिवाय, दिल्लीतही आम आदमी पार्टीने काँग्रेसला सातपैकी एक जागा देऊ केली आहे.
हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : दिल्लीत आपकडून काँग्रेसला फक्त एकच जागा, कारण…
उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागा असून अखिलेश यादव यांनी 11 जागा वाढवून काँग्रेसला 15 जागा देण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी समाजवादी पक्षाकडे आणखी तीन जागा मागितल्या. अखिलेश यादव यांनी जागांची संख्या दोनने वाढवली आणि काँग्रेसला 17 जागा देण्याची फायनल ऑफर दिली. मात्र, बिजनौर आणि मुरादाबादच्या जागेवर चर्चेचे घोडे अडले आहे. काँग्रेसला यापैकी एक जागा हवी आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या विनंतीवरून समाजवादी पक्षाने दानिश अली यांच्यासाठी अमरोहा आणि इम्रान मसूद यांच्यासाठी सहारनपूर या जागा सोडल्या आहेत, असेही सूत्रांनी सांगितले. तथापि, दोन्ही पक्षांमध्ये जागांबाबत सहमती झाली तरच राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत आपण सहभागी होणार असल्याचे अखिलेश यादव यांनी सांगितले होते. पण यातून मार्ग न निघाल्याने ते आता सहभागी होणार नाहीत.
हेही वाचा – Lok Sabha Election : “शिंदे गटाला जेवढ्या जागा मिळतील तेवढ्याच…”, भुजबळांची जागावाटपावर प्रतिक्रिया
समाजवादी पार्टीची दुसरी यादी जारी
समाजवादी पार्टीने 80 पैकी 65 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. एकीकडे अखिलेश यादव काँग्रेसच्या उत्तराची वाट पाहत असतानाच समाजवादी पार्टीने उमेदवारांची दुसरी यादी जारी केली आहे. यामध्ये 11 उमेदवार आहेत. मुख्तार अन्सारी यांचा भाऊ अफजल अन्सारी यांना गाझीपूरमधून तिकीट देण्यात आले आहे. पहिल्या यादीत 16 नावे जाहीर करण्यात आली होती. यापूर्वी 7 जागा राष्ट्रीय लोक दल आणि 11 जागा काँग्रेसला देण्याची भूमिका घेतली होती. पण राष्ट्रीय लोक दल आता भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी झाला आहे. तर, काँग्रेस 20 जागांची मागणी करत आहे. यात अशा काही जागा आहेत, ज्यावर समाजवादी पार्टीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
हेही वाचा – Supriya Sule : तुम्हाला वेगळी चूल मांडायची असेल तर जरूर मांडा पण…