India and Pakistan In UN : जिनिव्हा : काश्मीरच्या मुद्द्यावरून कायम भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या पाकिस्तानला भारताने जिनिव्हात झालेल्या संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत (UNHRC) चांगलेच ठणकावले. याच परिषदेत पाकिस्तानने भारतावर जम्मू – काश्मीरमधील लोकशाही नष्ट करण्यचे तसेच मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. त्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तान कोणत्याही पुराव्याशिवाय बिनबुडाचे आरोप करत असल्याचे भारताने म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रातील भारतीय राजदूतांनी पाकिस्तानला चांगलेच सुनावले आहे. मानवाधिकारांचे सातत्याने उल्लंघन करणारा पाकिस्तान दुसऱ्याला बोलू शकत नाही, असे सांगतानाच पाकिस्तानचे संपूर्ण भाषण हे खोटेपणाने भरले असल्याचे भारताने म्हटले आहे. (india gave befitting reply to pakistan in un said you are not in a position to preach on kashmir)
भारतीय राजदूत क्षितिज त्यागी म्हणाले की, पाकिस्तानने भारतावर केलेले बिनबुडाचे आरोप तसेच द्वेषपूर्ण टिप्पणीवर भारत उत्तर देत आहे. पाकिस्तानचे कथित नेतृत्व आणि प्रतिनिधी हे दहशतवादाच्या मार्गाने पसरवलेले खोटे अधिक पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे पाहणे दुर्दैवी आहे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – Bangladesh Crisis : देशातील अराजकतेला आपणच कारणीभूत, सैन्यप्रमुखांना चिंता
यापूर्वी आपले म्हणणे मांडताना पाकिस्तानचे कायदा, न्याय आणि मानवाधिकार मंत्री आजम नजीर तारार यांनी भारतावर टीका केली होती. ते म्हणाले होते की, काश्मीरमधील लोकांना स्वतःचा निर्णय घेऊ दिला जात नाही. हे संयुक्त राष्ट्राच्या चार्टर तसेच आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे. तसेच या भागात मानवाधिकारांचे उल्लंघन होते, जे रोखणे गरजेचे आहे, असेही पाकिस्तानने म्हटले होते.
या आरोपांना उत्तर देताना भारताने काश्मीरमधील विकासकामे आणि येथे झालेल्या विकासाचा हवाला दिला. तसेच काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. त्यागी म्हणाले की, जम्मू – काश्मीर आणि लडाख हे नेहमीच भारताचा अविभाज्य भाग होते आणि कायम राहतील, असेही ते म्हणाले.
गेल्या काही वर्षात जम्मू – काश्मीरमध्ये झालेला राजकीय, सामाजिक आणि आर्थिक विकास याचेच निदर्शक आहे. सरकार या भागासाठी घेत असलेल्या कष्टांवर लोकांचा विश्वास आहे, हेच यातून दिसते. जवळपास दशकभरापासून दहशतवादाला तोंड देणाऱ्या या भागाचा विकास करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
भारताची भूमिका स्पष्टपणे सांगतानाच पाकिस्तानने सातत्याने भारतावर आरोप करणे सोडून आपल्या देशातील परिस्थितीवर लक्ष द्यायला हवे, असे त्यागी म्हणाले. भारतासंबंधात टिप्पणी करण्याऐवजी आपल्या देशातील लोकांना न्याय द्या तसेच देशात सुशासन राबवा, असेही ते म्हणाले. ज्या देशात सातत्याने मानवाधिकारांचे उल्लंघन होते, अल्पसंख्याकांना सातत्याने वाईट वागणुकीला तोंड द्यावे लागते, तसेच लोकशाहीची मूल्ये पाळली जात नाहीत आणि संयुक्त राष्ट्रांकडून प्रतिबंधित दहशतवाद्यांना जो आसरा देतो, अशा देशाकडे कोणालाही काहीही शिकवण्याचा अधिकार नाही.
हेही वाचा – Thackeray Vs Fadnavis : या ‘नरेटिव्ह’चे बाप कोण? उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना सवाल