न्यूयॉर्क – पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अनवर-उल-हक काकर यांनी संयुक्त राष्ट्राच्या (UN) जनरल अॅसेंबलीमध्ये पुन्हा एकदा काश्मिरचा राग आळवला. त्यानंतर भारताने पाकिस्तानवर या मंचाचा दुरूपयोग करण्याचा आरोप केला आहे.
संयुक्त राष्ट्रात (UN) भारताच्या प्रथम सचिव पेटल गेहलोत म्हणाल्या, ‘पाकिस्तानला या मंचाचा दुरुपयोग करण्याची सवय झाली आहे. ते याचा वापर कायम भारताविरोधात आणि दुष्प्रचारासाठी करत आले आहेत. त्यांच्या देशातील प्रश्नांवरुन लक्षविचलित करण्यासाठी ते वारंवार काश्मीरचा मुद्दा उपस्थित करतात. पाकिस्तानने प्रथम मुंबई 26/11 वरील ह्ल्ल्यातील दोषींवर कारवाई करावी असे गेहलोत यांनी पाकिस्तानला सुनावले.
भारताने खडसावले – सीमेवर दहशतवाद्यांना आश्रय देणे बंद करा
पेटल गेहलोत यांनी राईट टू रिप्लाय अंतर्गत पाकिस्तानला खडसावले. पीओकेचे नाव न घेता त्या म्हणाल्या,’सर्वप्रथम पाकिस्तानने त्या भागातून काढता पाय घेतला पाहिजे, ज्यांच्यावर त्यांनी अवैध कब्जा केला आहे. त्यासोबतच मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्यातील दोषींवरही कारवाई केली पाहिजे.’
गेहलोत म्हणाल्या, ‘पाकिस्तानने दहशतवाद्यांवर कारवाई केली पाहिजे आणि सीमेवर दहशतवाद्यांना दिले जाणारे समर्थनही बंद केले पाहिजे. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचाराला पायबंद घालण्याची त्यांच्या सरकारची जबाबदारी आहे. मानवाधिकार हनन प्रकरणात पाकिस्तानचा रेकॉर्ड जगामध्ये सर्वाधिक वाईट आहे.’
हेही वाचा : Explainer : मुख्यमंत्र्यांसह 16 आमदार अपात्रतेवर सोमवारी सुनावणी; शिंदेंनंतर भाजपसमोर पर्याय काय?
शेजारी राष्ट्रांसोबत आम्हाला शांतीपूर्ण संबंध हवेत – पाकिस्तान
भारताच्या सचिवांआधी पाकिस्तानने UN च्या जनरल अॅसेंबलीमध्ये निवेदन केले. त्यांनी पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान काकर म्हणाले, आम्हाला आमच्या सर्व शेजारी राष्ट्रांसोबत शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करायचे आहे. काश्मीर मुद्दा हा भारतासोबतच्या संबंधाची चावी आहे. विकासासाठी शांतता अतिशय आवश्यक आहे.
पाकिस्तानने पुढे म्हटले, संयुक्त राष्ट्राच्या देखरेखीत जम्मू-काश्मीरमध्ये जनमत संग्रह करुन अंतिम निर्णय घेण्याचे UNSCच्या रिजोल्यूशनमध्ये म्हटलेले आहे. भारताने याचेही पालन केलेले नाही. ऑगस्ट 2019 पासून भारताने अवैधरित्या ताबा केलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये जवळपास 9 लाख सैनिकांची तैनाती केली आहे. जेणेकरुन ते त्यांचा निर्णय काश्मिरवर थोपवू शकतील.
भारताने दिले रोखठोक उत्तर- आमच्याकडे बोट दाखवण्यापूर्वी आपले घर सांभाळा
भारताच्या फर्स्ट सेक्रेटरी गेहलोत म्हणाल्या, विशेषतः जेव्हा अल्पसंख्याक आणि महिलांच्या अधिकारांचा मुद्दा उपस्थित होतो, तेव्हा पाकिस्तानमधील परिस्थिती हे सर्वाधिक वाईट असल्याचे समोर येते. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशावर आरोप करण्यापूर्वी पाकिस्तानने आपल्या घरात काय चालेल ते पाहिले पाहिजे. आमच्याकडे बोट दाखवण्यापूर्वी आपले घर सांभाळा असा टोला भारतीय सचिवांनी पाकिस्तानला लगावला.