india lockdown : वाढत्या संसर्गामुळे वीकेंड लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू; जाणून घ्या कोणत्या राज्यात कोणते निर्बंध?

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी एका बैठकीनंतर नागरिकांना अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरचं घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.

india lockdown weekend curfew delhi karnataka imposed night curfew know other states update

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये निर्बंधांची प्रक्रिया सुरु झाली आहे. यात नवी दिल्ली, कर्नाटकात वीकेंड कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. तर अनेक राज्यांमध्ये नाईट कर्फ्यू आधीच लागू करण्यात आला आहे. त्यामुळे कर्नाटक आणि दिल्लीत नागरिकांना आता कोरोनासंबंधीत कडक निर्बंधांचे पालन करावे लागणार आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी एका बैठकीनंतर नागरिकांना अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरचं घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त सर्व सरकारी अधिकाऱ्यांनी घरून काम करावे तसेच खाजगी संस्थांमध्ये 50 टक्के उपस्थितीने काम करावे अशा सुचना दिल्या आहेत.

दिल्लीत कडक निर्बंध लागू 

१) दिल्लीत शुक्रवारी रात्रीपासून ते सोमवारी सकाळी पर्यंत कर्फ्यू असेल. रोज नाईट कर्फ्यू असेलच शिवाय शनिवार आणि रविवारी वीकेंड कर्फ्यू असेल. रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत हा कर्फ्यू लागू असेल.

२) दिल्लीतील नागरिकांच्या समस्या लक्षात घेत रेल्वे, मेट्रो पूर्ण क्षमतेने चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

३) खाजगी कार्यालयात 50% क्षमतेने काम करण्यास परवानगी. शासकीय कार्यालयातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतरांना कार्यालयात येण्यास बंदी. ऑनलाइन किंवा घरून काम करण्याच्या सुचना.

४) पब, क्लब, रेस्टॉरंट, बार, हॉटेल्स, सिनेमा हॉल, थिएटर, ऑडिटोरियम 50 टक्के क्षमतेने चालवले जातील.

उत्तर प्रदेशात लग्न सोहळ्यांवर बंदी

१) उत्तर प्रदेशात नाईट कर्फ्यू आता रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत असेल.

२) राज्यातील दहावीपर्यंतच्या सर्व शाळा बंद राहणार आहेत.

३) 6 जानेवारीपासून कोणत्याही कार्यक्रमात 100 पेक्षा जास्त लोक उपस्थित राहणार नाहीत. लग्न, समारंभ अशा ठिकाणी हाच नियम असेल. कोणत्याही खुल्या ठिकाणी 50 टक्क्यांपेक्षा जास्त लोक नसावेत.

४) जिम, स्पा, सिनेमागृह, वेडिंग हॉल, रेस्टॉरंट आणि इतर सार्वजनिक ठिकाणे फक्त 50 टक्के क्षमतेने उघडतील.

कर्नाटकातही सिनेमागृह, शाळा बंद

१) 7 जानेवारीपासून कर्नाटकातही वीकेंड कर्फ्य घोषित करण्यात आला आहे.

२) कर्नाटकात रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी असेल.

३) बेंगळुरूमधील सर्व शाळा, महाविद्यालये (मेडिकल, पॅरा मेडिकल कॉलेज वगळता) बंद राहतील.

४) पब, क्लब, रेस्टॉरंट, बार, हॉटेल्समधील रेस्टॉरंट्स इत्यादी केवळ 50 टक्के क्षमतेने उघडतील.

५) सिनेमा हॉल, मल्टिप्लेक्स, थिएटर्स, ऑडिटोरियम इत्यादी देखील फक्त 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील.

बिहारमध्ये धार्मिक स्थळे बंद

१) 6 जानेवारी ते 21 जानेवारीपर्यंत बिहारमध्ये रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू राहील.

२) आठवीपर्यंत शाळा बंद राहतील.

३) शासकीय व निमसरकारी कार्यालये 50 टक्के क्षमतेने काम करतील.

४) नववी आणि उच्च शिक्षण संस्था 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील.

५) लग्न समारंभ आणि धार्मिक कार्यक्रमात जास्तीत जास्त 50 लोकांना परवानगी असेल.

६) दुकाने आणि खाजगी आस्थापने रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील.

७) धार्मिक स्थळे बंद राहतील. मॉल्स, सिनेमा, क्लब, स्विमिंग पूल, स्टेडियम, जिम, उद्याने 21 जानेवारीपर्यंत बंद राहतील.

पंजाबमध्येही लसवंतांनाच कार्यालयांत प्रवेश

१) पंजाबमध्ये बार, सिनेमा हॉल, मॉल्स, रेस्टॉरंट्स, स्पा, एसी बसेस फक्त 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. मात्र येथील सर्व कर्मचाऱ्यांना लसीकरण पूर्ण करणे गरजेचे आहे.

२) स्विमिंग पूल आणि जिम पूर्णपणे बंद राहणार आहेत.

३) कोणत्याही कार्यालयात केवळ पूर्ण लसीकरण झालेल्या लोकांनाच येण्याची परवानगी आहे.

४) अत्यावश्यक नसलेली कामे रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत बंद. म्हणजेच नाईट कर्फ्यू लागू असेल.

छत्तीसगडमध्ये सर्व जाहीर कार्यक्रमांना बंदी

१) छत्तीसगडमध्ये रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू असेल.

२) रॅली, कार्यक्रम, खेळ अशा कोणत्याही सार्वजनिक मेळाव्यास मनाई करण्यात आली आहे.

३) रेल्वे स्थानके आणि राज्याच्या सीमांवर कोरोना तपासणी सुरु आहे.