नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अटकेच्या निषेधार्थ आज दिल्लीतील रामलीला मैदानावर आज ‘इंडिया’ आघाडीच्यावतीने लोकशाही वाचवा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीच्या पाच मागण्या सांगितल्या. तसंच प्रभू श्रीरामांचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र डागलं. (INDIA Mega Rally Lord Rama Fought for Truth It is drowned in rituals Priyanka Gandhi s criticism)
काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी म्हणाल्या, ‘दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी रामलीला मैदानात रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. जे आज सत्तेत आहेत ते स्वतःला रामभक्त म्हणवतात. परंतु त्यांना आठवण करुन देणं गरजेचं आहे की ते कर्मकांडात मग्न झाले आहेत, असे मला वाटते. आज मी त्यांना हजारो वर्षे जुनी गाथा काय होती याची आठवण करून देऊ इच्छिते. प्रभू राम जेव्हा सत्यासाठी लढले तेव्हा त्यांच्याकडे संसाधने नव्हती, त्यांच्याकडे रथही नव्हता. रावणाकडे साधनसंपत्ती होती. भगवान रामामध्ये सत्य, आशा, विश्वास, प्रेम, दान, संयम आणि धैर्य होते.
प्रभू रामाच्या जीवनातील संदेश काय होता, हे सत्तेत असलेले आपले पंतप्रधान मोदी यांना मी आठवण करून देऊ इच्छिते. सत्ता कायमस्वरूपी टिकत नाही. सत्ता येते आणि जाते, अहंकार चिरडला जातो, असं म्हणत प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.
इंडिया आघाडीच्या मागण्या
- भारताच्या निवडणूक आयोगाला लोकसभा निवडणुकीत समान संधी द्यायला हवी
- निवडणूक आयोगाने आयकर विभाग, ईडी आणि सीबीआयकडून विरोधी पक्षांवरील कारवाई थांबवावी
- हेमंत सोरेन, केजरीवाल यांची तत्काळ सुटका केली जावी
- निवडणुकीच्या काळात विरोधी पक्षांची आर्थिक गळचेपी करणारी बळजबरी कारवाई तत्काळ थांबवावी.
- भाजपाला इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आर्थिक मदतीची चौकशी व्हावी. कंपनीने केलेल्या खंडणी आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपांची चौकशी करण्यात यावी. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटी स्थापन करण्यात यावी.