घरदेश-विदेशभारत-पाकिस्तान अण्वस्त्रयुद्ध अशक्य - परवेझ मुशर्रफ

भारत-पाकिस्तान अण्वस्त्रयुद्ध अशक्य – परवेझ मुशर्रफ

Subscribe

भारत आणि पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध होणं शक्य नाही आणि झालंच तर ते भयंकर विध्वंसकारी असेल, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी दिली आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर बिघडलेल्या भारत-पाकिस्तान संबंधांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये अण्वस्त्र युद्ध होण्याची चर्चा सध्या दोन्ही देशांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर होऊ लागली आहे. याची भिती अनेक देशांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, ‘भारत आणि पाकिस्तान यांच्यात काहीही झालं, तरी अण्वस्त्रयुद्ध होऊ शकत नाही’, अशी स्पष्ट प्रतिक्रिया पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांनी दिली आहे. ‘असं काही झालं तर ते विध्वंसक ठरेल’, अशी भिती देखील त्यांनी वर्तवली आहे. दुबईमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुशर्रफ यांनी हे वक्तव्य केल्याचं वृत्त गल्फ न्यूजने दिलं आहे.

‘तर भारत २० अणुबॉम्ब टाकेल’

यावेळी भारत-पाकिस्तान यांच्यात अण्वस्त्र युद्ध होण्याची शक्यता मुशर्रफ यांनी साफ फेटाळून लावली. ‘असा विचार करणं देखील चुकीचं आहे. असं काही युद्ध झालं आणि त्यात जर पाकिस्तानने १ अणुबॉम्ब वापरला, तर भारत २० अणुबॉम्ब टाकेल. आणि त्याच्या उत्तरादाखल कदाचित पाकिस्तानला ५० अणुबॉम्ब टाकावे लागतील. ते खूप भीषण असेल. जे कुणी अशा प्रकारे अण्वस्त्र युद्धाची शक्यता बोलून दाखवत आहेत, त्यांना युद्धाची अजिबात कल्पना नाहीये’, असं मुशर्रफ यावेळी बोलताना म्हणाले. ‘अण्वस्त्र ही युद्धात प्रत्यक्ष वापरण्यासाठी नसून फक्त दबदबा ठेवण्यासाठी किंवा संभाव्य धोका निर्माण करण्यासाठी असतात. शिवाय, दोन्ही देशांमध्ये सध्या निर्माण झालेली परिस्थिती युद्ध होण्याइतपत टोकाला जाईल असं वाटत नाही’, असं देखील मुशर्रफ यांनी सांगितलं.

- Advertisement -

पुलवामामध्ये RDX आले कसे? मोदींनी उत्तर द्यावे – असदुद्दीन ओवैसी

‘पुलवामा’नंतर पाकिस्तान दबावाखाली

दरम्यान, पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर भारतासोबतच अनेक देशांकडून दबाव येऊ लागला आहे. अमेरिका, रशियासह काही आखाती देशांनी देखील भारताच्या भूमिकेला समर्थन दिलं आहे. भारताने याआधीच पाकिस्तानचा ‘मोस्ट फेव्हर्ड नेशन’चा दर्जा काढून घेतला आहे. तसेच, सिंधू जल करारातून माघार घेत काश्मिर प्रांतातून वाहणाऱ्या ३ नद्यांमधून पाकिस्तानला जाणारा पाणीपुरवठा देखील अडवला आहे. त्याशिवाय फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) या संघटनेनं पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये कायम ठेवलं आहे.


पुलवामा हल्ल्याचा पाकिस्तानी पत्रकारांनी केला निषेध

या सर्व दबावाच्या पार्श्वभूमीवर अखेर पाकिस्तानला कारवाई करणं भाग पडलं असून दोनच दिवसांपूर्वी पाकिस्तानी लष्करानं पाकिस्तानी पंजाब प्रांतातल्या जैश ए मोहम्मदच्या तळावर कारवाई करत तो ताब्यात घेतला होता. ५० हून अधिक जवानांचे प्राण घेणाऱ्या पुलवामा हल्ल्याची जबाबदारी याच जैश-ए-मोहम्मद संघटनेनं घेतली असून त्याचा म्होरक्या मसूद अजहरच्या अटकेची मागणी मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -