Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश बालाकोट हवाईहल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान होते आण्विक युद्धाच्या तयारीत, अमेरिकेकडून गौप्यस्फोट

बालाकोट हवाईहल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान होते आण्विक युद्धाच्या तयारीत, अमेरिकेकडून गौप्यस्फोट

Subscribe

वॉशिंग्टन : फेब्रुवारी 2019मध्ये बालाकोटमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यामुळे संतप्त झालेला पाकिस्तान भारतावर अण्वस्त्र हल्ला करण्याच्या तयारीत होता. तर, दुसरीकडे भारतही त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज होता, असा गौप्यस्फोट अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पीओ यांनी केला आहे. भारताच्या तत्कालीन माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचा हवाला देत पॉम्पीओ यांनी आपल्या नव्या पुस्तकात हा दावा केला आहे. मात्र, तथापि, पॉम्पीओ यांच्या या दाव्यावर परराष्ट्र मंत्रालयाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी पाकिस्तानने केलेल्या भ्याड आत्मघाती हल्ल्यात सीआरपीएफच्या 40हून अधिक जवानांना वीरमरण आले. त्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोट येथील दहशतवादी तळावर हल्ला चढवत या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले होते. या हल्ल्यात एकही पाकिस्तानी नागरिक मारला गेला नसल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला होता. परंतु या हल्ल्याला दोन वर्षे उलटल्यानंतर पाकिस्तानचा माजी राजनैतिक अधिकारी आगा हिलाली यांनी एका टीव्ही शोमध्ये, भारतीय हवाई दलाने बालाकोटमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात सुमारे 300 लोक मारले गेल्याची कबुली दिली होती.

- Advertisement -

माइक पॉम्पीओ यांचे ‘नेव्हर गिव्ह अॅन इंच : फायटिंग फॉर द अमेरिका आय लव्ह’ हे पुस्तक मंगळवारी उपलब्ध झाले. 27-28 फेब्रुवारी 2019ला यूएस-उत्तर कोरिया शिखर परिषदेसाठी आपण आणि आपली टीम हनोई येथे उपस्थित होतो आणि आण्विक युद्धाचे संकट टाळण्यासाठी आमची टीम रात्रभर पाकिस्तान आणि भारतासोबत चर्चा करत होती, असे माइक पॉम्पिओ यांनी या पुस्तकात म्हटले आहे.

फेब्रुवारी 2019मध्ये भारत-पाकिस्तानमधील शत्रूत्व आण्विक युद्धापर्यंत कसे पोहोचले होते याची जगाला कल्पना असेल, असे मला वाटत नाही. यातून नेमका मार्ग कसा काढायचा, हे मला ठाऊक नव्हते; मला एवढेच माहीत होते की, ते युद्धाच्या निर्णयाप्रत पोहोचले होते, असे पॉम्पीओ यांनी या पुस्तकात नमूद केले आहे.

- Advertisement -

व्हिएतनामच्या हनोईमधील ती रात्र मी कधीही विसरणार नाही. उत्तर कोरियाशी अण्वस्त्रांबाबत चर्चा करणे जसे जिकरीचे होते, तसेच काहीसे काश्मीर प्रश्नांवरून अनेक दशकांपासून सुरू असलेल्या वादाच्या संदर्भात भारत आणि पाकिस्तानने एकमेकांना धमक्या देण्यास सुरुवात केली होती, असे पॉम्पीओ यांनी म्हटले आहे.

हनोईमध्ये त्या रात्री मी सुषमा स्वराज यांच्याशी बोललो. पाकिस्तानने हल्ल्यासाठी अण्वस्त्रे सज्ज करण्यास सुरुवात केली होती, असे त्यांचे मत होते. त्याच्या प्रत्युत्तरादाखल भारत सुद्धा कारवाईचा विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले. काहीही करू नका आणि आम्हाला सर्वकाही ठीक करण्यासाठी थोडा वेळ द्या असे मी त्यांना सांगितल्याचे पॉम्पीओ यांनी म्हटले आहे. तर, पाकिस्तानचे तत्कालीन सेनाप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्याशी देखील मी त्यावेळी चर्चा केली. भारताने आपल्याला काय सांगितले, हे त्यांच्या कानावर घातल्यावर ते म्हणाले की, हे चुकीचे आहे, असे या पुस्तकात पॉम्पीओ यांनी नमूद केले आहे.

- Advertisment -